स्वयंसेवी संस्था आणि काळाबाजार करणाऱ्यांवर नरेंद्र मोदींचा आरोप
एक चहावाला पंतप्रधान झालेला काही लोकांना पाहवत नसून मला बदनाम करण्याचे आणि सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान स्वयंसेवी संस्था आणि काळा बाजार करणाऱ्यांकडून सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. या असंतुष्ट यंत्रणेसमोर आपण झुकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्तीसगडच्या दौऱ्यानंतर ओदिशातील बारगड येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. येथे त्यांनी ‘रुर्बन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील ३०० गावांचा शहरी केंद्रांमध्ये विकास केला जाणार आहे. केंद्र सरकार देशातील गोरगरीब, पीडित आणि दलित जनतेच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मोदी म्हणाले की, सरकारने युरियावर कडुनिंबाचे विलेपन करण्याचा निर्णय घेतल्याने काळा बाजारात गुंतलेल्या व्यक्तींना सरकारी युरियाचा काळा बाजार करून तो खासगी रासायनिक कारखान्यांना पुरवणे अवघड झाले आहे. त्यांचा हा उद्योग बंद पडल्याने साहजिकच ते आणि त्यांच्या पाठीशी असलेले कारखानदार माझ्यावर व सरकारवर नाराज आहेत. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांना परदेशांतून आर्थिक मदत मिळते, त्यात गैर काही नाही. पण सरकारने त्या निधीचा हिशेब मागायला सुरुवात करताच या संस्थाही सरकारच्या विरोधात गेल्या आहेत. देशाला पैसा कोठून येतो आणि कोठे खर्च होतो हे कळाले पाहिजे. त्यामुळेच या असंतुष्ट घटकांनी सरकारविरोधी कट-कारस्थाने आणि आंदोलने चालवली आहेत.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा