अंजिष्णू दास/ सुखमणी मलिक, एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर १६ मार्चपासून लागू झालेल्या आचारसंहितेनंतर १५ मेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १११ भाषणे केली. त्याचे विश्लेषण ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केले असता काही रोचक बाबी समोर आल्या आहेत.
प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या भाषणात मुख्यत: काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका, विकास आणि विश्वगुरू, २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचे आश्वासन हे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित करण्यात येत होते. त्यानंतर ५ एप्रिलला काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर हिंदू-मुस्लीम मुद्दे, संपत्तीचे फेरविचरण आणि अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे आरक्षण कमी करून ते धर्माच्या आधारावर आरक्षण यावर मोदींच्या भाषणांमध्ये भर राहिल्याचे दिसून येते. narendramodi.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या भाषणांवरून हे विश्लेषण करण्यात आले आहे. या काळातील भाषणांमध्ये मोदींनी रोजगाराविषयी ४५ वेळा भाष्य केले आणि ते मुख्यत: सरकारी प्रकल्प व योजनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संदर्भात होते. पाच भाषणांमध्ये ते महागाईविषयी बोलले. सरकारी योजनांमुळे महागाईपासून दिलासा कसा मिळाला आहे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवण्यात आले आहे यावर त्यांचा भर दिसून आला.
२१ एप्रिल ते १५ मे (६७ भाषणे)
● या कालावधीत पंतप्रधान मोदींनी कल्याणकारी योजना आणि विकास या मुद्द्यांवर सर्वाधिक भर दिला. त्यांच्या ६७पैकी ६० भाषणांमध्ये त्यांनी या मुद्द्यांवर भाजपला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांनी ४३ भाषणांमध्ये राम मंदिराचा उल्लेख केला. दुसरीकडे ‘४०० पार’ची घोषणा केवळ १६ वेळा देण्यात आली. राजस्थानच्या बांसवारा येथे २१ एप्रिलला केलेल्या प्रचारसभेत मोदींनी मुस्लिमांचा उल्लेख केला आणि त्यानंतर त्यांच्यासाठी ‘घुसखोर’ हा शब्दप्रयोग केला. त्यांच्या १११ भाषणांमध्ये एकूण १२ वेळा ‘घुसखोर’ हा शब्द ऐकायला आला. याच काळात त्यांनी हिंदू स्त्रियांचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल असा दावा केला.
● बांसवारामध्ये पहिल्यांदा त्यांनी मंगळसूत्राबद्दल टिप्पणी केली, तेव्हापासून २३ भाषणांमध्ये त्यांनी महिलांचे मंगळसूत्र धोक्यात असल्याचे सांगितले आहे. या काळात मोदींनी सर्वाधिक हिंदू-मुस्लीम टिप्पण्या केल्या. काँग्रेसच्या मुस्लीम मतपेढीला लाभ मिळवून देण्यासाठी संपत्तीचे फेरवाटप किंवा अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी आरक्षणाची लूट याबद्दल त्यांनी ६७पैकी ६० वेळा आरोप केले. त्याबरोबरच काँग्रेस व विरोधकांचा गैरकारभार ६३ वेळा आणि भ्रष्टाचार ५७ वेळा उपस्थित केले. एकूण ८४ वेळा ते गरिबांविषयी बोलले. एकूण ८४ वेळा ते गरिबांविषयी बोलले, तर शेतकऱ्यांविषयी ६९ आणि तरुणांविषयी ५६ वेळा बोलले.
हेही वाचा >>>नाना पटोलेंकडून योगी आदित्यनाथांची रावणाशी तुलना; म्हणाले, “सीतेला पळवून नेण्यासाठी…”
१७ मार्च ते ५ एप्रिल (१० भाषणे)
या काळात मोदींनी आपली भाषणे मुख्यत: केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना, भाजपने केलेला विकास यावर केंद्रित केली होती. त्यांच्या सर्व भाषणांमध्ये हे मुद्दे उपस्थित झाले. त्याशिवाय विश्वगुरूचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. भारताची जागतिक पातळीवर प्रतिमा उंचावली असल्याचे त्यांनी १०पैकी आठवेळा सांगितले. या सर्वा १० भाषणांमध्ये त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर टीका केली. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोप त्यांनी विरोधकांवर केले. मोदींनी १६ मार्चनंतर निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यानंतर वारंवार ‘४०० पार’ची घोषणा दिली. पहिल्या १० भाषणांमध्ये त्यांनी आठवेळी ‘४०० पार’ आणि १०पैकी सहावेळा राम आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.
६ एप्रिल ते २० एप्रिल (३४ भाषणे)
काँग्रेसचा जाहीरनामा ५ एप्रिलला प्रसिद्ध झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी राजस्थानातील नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथे भाषण करताना, या जाहीरनाम्यावर ‘मुस्लीम लीग’चा ठसा असल्याचा आरोप केला. या कालावधीत मोदींनी केलेल्या ३४पैकी सात भाषणांमध्ये काँग्रेसचे ‘न्याय पत्र’ हा ‘मुस्लीम लीगचा जाहीरनामा’ असल्याचा दावा केला. त्याशिवाय १७ वेळा विरोधक हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचा उल्लेख ते यासाठी करत असत. त्यांनी २६ वेळा राम आणि राम मंदिराचा उल्लेख केला. विरोधकांवर, विशेषत: काँग्रेसवर टीका करताना मोदींनी २७ भाषणांमध्ये त्यांच्यावर घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. याच कालावधीत ते ३२ वेळा विकास, ३१ वेळा कल्याणकारी योजना आणि १९ वेळा विश्वगुरू याविषयी बोलले. मात्र, ‘४०० पार’ची घोषणा हळूहळू कमी होऊन ३४ पेकी १३ वेळा त्यांनी त्याचा उल्लेख केला.
मुद्दे भाषणांची संख्या
काँग्रेस ३२
विकास ३२
योजना ३१
इतर विरोधक २८
मोदींची हमी २८
विरोधकांचा भ्रष्टाचार २७
राम मंदिर २६
मुद्दे भाषणांची संख्या
काँग्रेस ६३
हिंदू-मुस्लीम ६०
योजना, विकास ६०
इतर विरोधक ५७
एससी/एसटी कल्याण ५४
विरोधकांचा भ्रष्टाचार ५०
गरीब ४९
मुद्दे भाषणांची संख्या
काँग्रेस, भ्रष्टाचार १०
योजना, विकास १०
गरीब, महिला ९
विश्वगुरू ८
इतर विरोधक ८
मोदींची हमी ७
राम मंदिर ६