नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं. त्यामुळे रविवारी ९ जून रोजी नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याबरोबरच या सोहळ्यादरम्यान शहराला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलं आहे. तसेच दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे रविवारी सायंकाळी ७ :१५ वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

हेही वाचा : अबकी बार…’एनडीए’ सरकार! सेंट्रल हॉलमधील ४८ मिनिटांच्या भाषणात मोदींकडून ३९ वेळा ‘एनडीए-गठबंधन’ शब्दांचा उल्लेख!

दिल्लीत कशी असणार सुरक्षा व्यवस्था?

पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवन आणि परिसरात संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी काही देशाचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्राध्यक्ष नवी दिल्लीच्या ज्या हॉटेल्समध्ये राहतील त्या हॉटेल्समध्ये सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे प्रमुख रानिल विक्रमसिंघे आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्यासह आदी मान्यवर या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे परदेशी मान्यवरांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

दिल्लीत शहर परिसरात दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीटी) परिसरात ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात रविवारी विमानाच्या घिरट्या बंद असतील.

दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलेलं असून हे निर्बंध आणि प्रतिबंध ९ जून ते १० जूनपर्यंत लागू असतील. या दिवशी ड्रोनवर बंदी घालण्यात आलेली आहे. या शपथविधी सोहळ्याला जी-२० सारखी सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी एसपीजी, दिल्ली पोलीस, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, गुप्तचर विभागाचे पथक, निमलष्करी दल, एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो आणि एनडीआरएफचे पथक सज्ज आहे.

याबरोबरच दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशात शपथविधी समारंभाच्या दृष्टीने दिल्लीच्या NCT च्या अधिकारक्षेत्रात लहान आकाराची शक्ती असलेली विमाने, क्वाडकॉप्टर किंवा विमानातून पॅरा-जंपिंग यावर बंदी असणार आहे.

तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिताच्या कलम १८८ नुसार दंड आकारला जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश जारी कऱण्यात आले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi swearing in ceremony will be held on sunday security has been beefed up in delhi gkt