पीटीआय, वॉशिंग्टन/लंडन

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि युक्रेनचे अध्यक्ष लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह डझनभर जागतिक नेत्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विजयाबद्दल आणि ऐतिहासिक निवडणुकीतील सुमारे ६५० दशलक्ष मतदारांचे अभिनंदन. दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाढत आहेत. आम्ही अमर्यादित सामर्थ्याचे सामायिक भविष्य ‘अनलॉक’ करतो,’ असे जो बायडन आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दूरध्वनी संभाषणादरम्यान मोदींचे यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनीही मोदींशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. यूके आणि भारत सर्वांत जवळचे मित्र असून, ही मैत्री पुढेही वाढत राहील,’ असे सुनक यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तर ‘जगातील सर्वांत मोठी निवडणूक भारतात पार पडली. नरेंद्र मोदी, माझे प्रिय मित्र, अभिनंदन. आपण भारत आणि फ्रान्सला एकत्र करणारी धोरणात्मक भागीदारी मजबूत करत राहू, असे मॅक्रॉन म्हणाले.इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावरून नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा >>>Video: चंद्राबाबूंच्या ‘त्या’ विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या; म्हणाले, “मी या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत”!

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि इस्रायलमधील मैत्री नवीन उंचीवर जाईल, बधाई हो!’ असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

दरम्यान, जमैकाचे पंतप्रधान अँर्ड्यू हॉलनेस, श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे आणि मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतिफ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

भारतातील निवडणूक निकालांची आम्ही नोंद घेतली आहे. भाजपप्रणीत एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन. द्विपक्षीय संबंधांचे हित लक्षात घेऊन भारतासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.– माओ निंग, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, चीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आव्हानांवर मात करण्यासाठी, जगभरात शांततेसाठी, सहकार्य वाढवण्यासाठी, नवीन संधी शोधताना भारतासोबत काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.– दिनेश गुणवर्देना, पंतप्रधान, श्रीलंका

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी तुमचे ऐतिहासिक तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत उल्लेखनीय प्रगती करत राहील. मॉरिशस-भारत विशेष संबंध चिरंतर राहो.– प्रविंद कुमार जगन्नाथ, पंतप्रधान, मॉरिशस

लोकसभा निवडणुकीतील सलग तिसऱ्यांदा यश प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. भारतीयांच्या उत्साही सहभागाने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा निवडणूक उत्सव यशस्वीपणे पूर्ण केल्याची नोंद ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. – पुष्प कमल दहल, पंतप्रधान नेपाळ

सलग तिसऱ्यांदा मिळवलेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी भारतीय पंतप्रधानांसोबत काम करण्यास आम्ही इच्छुक आहोत. – डॉ. मोहम्मद मुइज्जू, राष्ट्राध्यक्ष, मालदीव