नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ८ जून रोजी होणार की ९ जून रोजी याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अशात आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्हीही ठरलं आहे. काही माध्यमांनी त्यांचा शपथविधी ८ जून रोजी होणार आहे असंही म्हटलं होतं. मात्र आज नितीश कुमार यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी मोदींच्या शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे मोदी त्या दिवशी तिसऱ्यांदा शपथ घेतील.

आपल्या भाषणात काय म्हणाले नरेंद्र मोदी?

ज्यांनी ज्यांनी आपली सत्ता येण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एनडीएच्या नेते पदी माझी निवड करुन तुम्ही सगळ्यांनी मला नवी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. २०१९ मध्ये मी जेव्हा याच सदनात मी बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं विश्वास. आज पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझी निवड केली आहे याचा अर्थ आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला आहे.

हे पण वाचा- नरेंद्र मोदींचा टोला “मला वाटलं होतं ४ जूनच्या दिवशी इंडिया आघाडी ईव्हीएमची प्रेतयात्राच…”

मला तर वाटलं होतं की ईव्हीएमची प्रेतयात्रा निघणार

४ जूनचे निकाल लागत असताना मी माझ्या काही कामांमध्ये व्यग्र होतो. मला नंतर फोन येऊ लागले. मी त्यानंतर कुणाला तरी म्हटलं की ठीक आहे हे सगळं पण मला एक सांगा ईव्हीएम जिवंत आहे की मेलंय? या लोकांनी ठरवून टाकलं होतं की लोकशाहीवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे. यावेळी तर ईव्हीएमची प्रेतयात्रा निघेल असं वाटलं होतं. पण त्या ईव्हीएमनेच विरोधकांची तोंडं बंद केली. निवडणूक आयोग, लोकशाहीची ताकद त्यादिवशी सगळ्यांनाच कळली. असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला. आता त्यांच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्ही ठरलं आहे.

कधी होणार आहे नरेंद्र मोदींचा शपथविधी?

आज संसदीय नेते म्हणून मोदी यांची निवड करण्यात आली. जे. पी. नड्डांनी ठेवलेल्या प्रस्तावाला भाजपा आणि इतर मित्र पक्षांनी अनुमोदन दिलं. भाजपाप्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा येत्या रविवारी म्हणजेच ९ जून रोजी होईल. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील. मोदींची ही पाच वर्षे मोदी ३.० म्हणून ओळखली जातील. ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होणार आहे. आज संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.