पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी येत्या २ नोव्हेंबरला पुन्हा बिहारमध्ये जाणार आहेत. बिहारमधील भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी ही माहिती दिली.
पाटण्यामध्ये गेल्या रविवारी भाजपने नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या ठिकाणी सहा कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये आतापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले असून, ८२ जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीच मोदी पुन्हा बिहारमध्ये येणार आहेत. विशेष हेलिकॉप्टरने ते पाटणामध्ये येणार असून, तेथून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोदी ही सदिच्छा भेट घेत असल्याचे सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.