Shankaracharya Swami Avimukteshwarnadna on Modi : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसंच त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. दिल्लीतल्या बुराडी भागात केदारनाथ मंदिर बांधले जाणार आहे, त्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासह विश्वासघात झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद?
“आम्ही हिंदू धर्म, सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. आपल्या धर्मात पाप आणि पुण्य ही संकल्पना मांडली आहे. पापामध्ये घात ही संकल्पना आहे. तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचं सांगितलं गेलंय. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो. आम्हीही त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही”, अशी भावना यावेळी मी व्यक्त केल्याचंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.
राम मंदिराबाबत काय म्हणाले होते शंकराचार्य?
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिराविषयी मोठं वक्तव्य केलं होतं. अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राण प्रतिष्ठा सोहळा पुढे ढकलावा. २२ जानेवारीला होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा धर्मशास्त्राला धरुन नाही असं शंकराचार्य म्हणाले होते. तसंच २२ जानेवारी हा कुठलाही मुहूर्त नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. आता नरेंद्र मोदी हे आमचे शत्रू नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.
राम मंदिरात रामाच्या प्राणप्रतिष्ठेला केला होता विरोध
“मंदिर हे देवाचं रुप असतं. देवाचं शरीर म्हणजे मंदिर आणि मूर्ती म्हणजे देवाचा आत्मा. त्यातला कळस हे देवाचं शीर आहे. आता शिखर म्हणजेच देवाचे डोळे तेदेखील तयार झालेले नाहीत. पायापासून ते कळसापर्यंत देवाच्या अंगांची प्रतिष्ठापना केली जाते. चेहरा, कळस हे काहीही तयार झालेलं नाही. फक्त धड तयार आहे त्यात प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे. ही कुठलीही सामान्य चूक नाही. असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं होतं. आता मुंबईत आल्यांतर त्यांनी प्रति केदारनाथ मंदिरावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नरेंद्र मोदींबाबत काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आशीर्वाद घेतल्याचा या व्हिडीओ समोर आला होता. त्याबाबत विचारलं असता, अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी आले त्यांनी नमस्कार केला, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. त्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही सांगत आहोत. जर त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही त्यांची चूक दाखवून देतो, मोदी आमचे शत्रू नाहीत.”
आज शंकराचार्यांनी मुंबईचा दौरा केला. त्यांनी केदारनाथ मंदिराबाबत जे भाष्य केलं त्यावरुन आता त्यांना भाजपाचे नेते काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.