केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राज्यसभेत स्पष्टीकरण देण्याची नामुष्की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आली. निरंजन ज्योती यांनी माफी मागितल्याने आता हा विषय येथे थांबवावा, अशी विनवणी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केली. अर्थात मंत्रिमंडळातून निरंजन ज्योती यांच्या हकालपट्टीच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधकांचे मोदींच्या निवेदनामुळे समाधान झाले नाही. राज्यसभेत निवेदन दिले असले तरी पंतप्रधान लोकसभेत मात्र विरोधकांच्या रोषाला सामोरे गेले नाही.
 तासभर मोदींविरोधात घोषणाबाजी केल्यानंतर, मोदींनी निवेदन दिल्याशिवाय हा विषय संपणार नाही; असा इशारा देऊन काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले अशा प्रकारची भाषा न वापरण्याची ताकीद त्या बैठकीत देण्यात आली. खुद्द ज्यांनी हे विधान केले त्यांनी माफी मागितली आहे. त्या पहिल्यांदाच सभागृहात आल्या आहेत. त्यांना या सभागृहाने क्षमा करून यापुढे आपण सर्वजण मर्यादा सांभाळून बोलू, अशी ग्वाही द्यावी. मोदींच्या निवेदनानंतरही गोंधळ सुरूच राहिला. जोपर्यंत संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत  सभागृह चालू देणार नाही असा इशारा माकपच्या सीताराम येचुरी यांनी दिला.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली.