आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून वेगवेगळी आश्वासनं दिली जातायत. भाजपा ‘मोदी की गॅरंटी’ म्हणत देशभरातील जनतेला अनेक आश्वासनं देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१० मार्च) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना आझमगड हे उद्याचं आजन्मगड असेल, असे मोदी म्हणाले.
“संपूर्ण देशच मोदीचा परिवार”
नरेंद्र मोदी यांनी आझमगडमधील एका सभेला संबोधित करताना विरोधकांवर टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळेच या राज्यात तुष्टीकरणाचे विष कमी होताना दिसतेय. राजदचे नेते लालूप्रसाद यादव म्हणतात की मला माझ्या स्वत:चा परिवार नाही. पण संपूर्ण देशच मोदीचा परिवार आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.
“अनेक दशकांपासून पूर्वांचलमध्ये जातीचं आणि तुष्टीकरणाचं राजकारण”
“उत्तर प्रदेशमध्ये वेगाने विकास होतोय. सध्या येथे तुष्टीकरणाला थारा दिला जात नाहीये. त्यामुळेच घराणेशाहीची जोपासना करणारे काही लोक हैराण झाले असून रोज माझी निंदा करतायत. गेल्या अनेक दशकांपासून पूर्वांचलमध्ये जातीचं आणि तुष्टीकरणाचं राजकारण केलं जायचं. मात्र गेल्या १० वर्षांपासून हा प्रदेश विकासाचं राजकारण पाहतोय. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये विकासाला चांगलीच गती मिळालेली आहे. अगोदर या भागात माफियाराज होते. आता मात्र या भागात कायद्याचे राज्य पाहायला मिळतेय,” असे म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.
“आजन्मगड हा विकासाचा गड असेल”
आझमगड हे भविष्यात आजन्मगड होईल, असंही मोदी म्हणाले. “आझमगड लवकरच आजन्मगड होईल. मी आज तुम्हाला आणखी एक मोदींची गॅरंटी देतो. उद्याचा आझमगड हा आजन्मगड असेल. आजन्मगड हा अनंत काळासाठी विकासाचा गड असेल. मोदींची हीच नवी गॅरंटी आहे,” असं मोदी म्हणाले.