काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीविरोधात अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार यशवंत सिन्हा यांनी कोलांटउडी मारत देशाचे पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असे आपण ठामपणे सांगत असल्याचे वक्तव्य केले. वेळ आली तर कोणीही पंतप्रधान होण्यासाठी तयार होईल. मात्र, मी ठामपणे सांगतो की देशाचे पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, असे यशवंत सिन्हा म्हणाले.
पक्षाचेच आणखी एक खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी असहमती दर्शविली. नितीशकुमार हे जरी पंतप्रधान बनण्यास लायक असले, तरी ते विश्वासघाती आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. बिहारमध्ये भाजपने संयुक्त जनता दलापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली असतानाही, त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी आमच्यासोबतची आघाडी मोडली. आमच्या कोणत्याही मंत्र्याने बिहारमध्ये राजीनामे दिले नाहीत. नितीशकुमार यांनीच आमच्या सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.

Story img Loader