पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांच्या मनाचा अंदाज घेणाऱ्या लोकसभा-विधानसभा पोटनिवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील विधानसभेची जागा वगळता गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील पोटनिवडणुकांत काँग्रेसच्या हाती पुरते अपयश आले. दुसरीकडे, गुजरातमध्ये सहा जागा भाजपकडे खेचून आणण्यात यश आल्याने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची दावेदारी अधिक पक्की बनली आहे. याउलट बिहारमधील एका लोकसभा जागेवर लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने वर्चस्व राखल्याने पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा बाळगणाऱ्या जदयुच्या नितीशकुमार यांना जबर हादरा बसला आहे.
गुजरातमध्ये आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दोन लोकसभा व चार विधानसभेच्या जागा भाजपने आपल्याकडे खेचून घेतल्या. काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेले सौराष्ट्रमधील प्रभावी नेते विठ्ठल रदाडिया यांनी पोरबंदर येथील लोकसभा जागा जिंकली, तर बनस्कांता येथील लोकसभेच्या जागेवर भाजपच्या हरिभाई चौधरी यांनी विजय मिळवला.
रदाडिया यांच्यासोबतच भाजपमध्ये दाखल झालेले त्यांचे पुत्र जयंत यांनी जेतपूर येथील विधानसभेच्या जागेवर विजय मिळवला. तर लिंबाडी, धोराजी आणि मोरवा हदफ या विधानसभेच्या जागाही भाजपने बळकावल्या. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेत्याचे पद न मिळाल्याने नाराज होऊन भाजपमध्ये गेलेल्या विठ्ठल रदाडिया  यांचा विजय काँग्रेससाठी अधिक जिव्हारी लावणारा आहे. तर पंतप्रधानपदाची मनीषा बाळगून असलेल्या मोदींसाठी या सहाही जागांवरील विजय भाजपमधील त्यांच्या विरोधकांना उत्तर देणारा ठरला आहे. या विजयाचा आनंद मोदींनी बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेदरम्यानही व्यक्त केला व ‘शतप्रतिशत विजय’चा नारा लगावला. काँग्रेसप्रणीत यूपीएला गाशा गुंडाळण्याचा इशारा देणारा कौल संतापलेल्या मतदारांनी दिला आहे, असे ते म्हणाले.  
एकीकडे, मोदींनी या विजयामुळे आपल्या दावेदारीचा खुंटा बळकट केला असताना भाजपप्रणीत एनडीएतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या जदयुचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी बिहारमधील महाराजगंज लोकसभा मतदारसंघातील पराभव धक्का देणारा ठरला. २००९च्या लोकसभा निवडणुकीत जदयुच्या ताब्यात असलेल्या या जागेवर जदयुतूनच राष्ट्रीय जनता दलमध्ये आलेल्या प्रभुनाथ सिंह यांनी विजय मिळवला.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील हावडा येथील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने २७ हजारांच्या मताधिक्याने माकपच्या उमेदवाराचा पराभव केला. तर उत्तर प्रदेशमधील हांडिया विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला. या दोन्ही राज्यांत काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना मोठे अपयश आले.

Story img Loader