प्रवासी भारतीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच गेल्या साडेचार वर्षांत देशातला उरलासुरला भ्रष्टाचारही पूर्णपणे रोखला आहे, असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रवासी भारतीय दिवस’ सोहळ्यात मंगळवारी केला.

राजीव गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, ‘‘रुपयातले अवघे १५ पैसे लाभार्थीपर्यंत पोहोचतात, अशी कबुली काँग्रेसच्याच एका माजी पंतप्रधानाने दिली होती. ही रुपयातली ८५ पैशाची लूटही आम्ही रोखली आहे. विविध योजनांद्वारे आम्ही लाभार्थीच्या खात्यांमध्ये पाच लाख ८० हजार कोटी रुपये थेट जमा केले आहेत. आम्ही नसतो तर आधीच्या सरकारप्रमाणेच चार लाख ५० हजार कोटी रुपयांच्या निधीला भ्रष्टाचारामुळे गळती लागली असती.’’

प्रवासी भारतीय दिवसानिमित्त ही १५वी परिषद  पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत झाली. या सभेतही मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ हे प्रमुख पाहुणे म्हणून या परिषदेस उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, ‘‘देश बदलू शकतो, यावर भाजप सरकारमुळे लोकांचा विश्वास बसला आणि आम्ही तो सार्थ करून दाखवला. काँग्रेसला या देशाला जडलेला भ्रष्टाचाराचा रोग माहीत होता, पण ना त्यांनी त्यावर विचार केला ना तो दूर करण्याच्या दिशेने काही उपाय केला!’’

ज्या पक्षाने देशावर दीर्घकाळ राज्य केले त्यांनीच या देशाला ही यंत्रणा बहाल केली होती. त्या यंत्रणेला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या रोगाचे वास्तव त्यांनी मान्यही केले होते. पण खेदाची गोष्ट अशी की ते मान्य करूनही ते बदलण्यासाठी त्यांनी १०-१५ वर्षांत काहीच केले नाही.’’

दरवर्षी ही परिषद ९ जानेवारीला आयोजित केली जाते. मात्र अनिवासी भारतीय प्रतिनिधींनी कुंभमेळ्यास भेट देता यावी यासाठी ही परिषद २१ ते २३ जानेवारी या कालावधीत प्रथमच आयोजिली जात आहे. या परिषदेस परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिग रावत, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि परराष्ट्रराज्यमंत्री व्ही. के. सिंग उपस्थित होते.

बोगस लाभार्थी रोखले

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आणि इच्छाशक्तीच्या आधारे आम्ही विविध सरकारी योजनांचा लाभ घेणारे सात कोटी बोगस लाभार्थी शोधून काढले, असेही मोदी यांनी सांगितले.  हे लाभार्थी प्रत्यक्षात नव्हतेच, तर केवळ कागदोपत्री त्यांची नोंद होती. ही संख्या ब्रिटन, फ्रान्स, इटलीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, हे लक्षात घेतले तर भ्रष्टाचाराचे भीषण रूप लक्षात येईल, असेही ते म्हणाले.

या परिषदेत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी मोदी यांच्या धडाडीचे कौतुक केले. पुढील महिन्यात मॉरिशसमध्ये भगवद्गीता महोत्सव आयोजिण्याची घोषणाही त्यांनी केली तसेच पुढील वर्षी भोजपुरी उत्सव साजरा करण्याची घोषणा केली.

सदिच्छादूत..अनिवासी भारतीय हे जगात भारताची प्रतिमा उजळवणारे सदिच्छादूतच आहेत, असे कौतुकोद्गारही मोदी यांनी काढले. भारताच्या क्षमतांचे दर्शन त्यांच्यामुळेच जगाला घडते, असे ते म्हणाले. पर्यावरण क्षेत्रासह काही क्षेत्रांतील  भारताच्या योगदानाची जाणीव जगाला होऊ लागली आहे, असेही ते म्हणाले.

मध्यमवर्गाच्या भावनेला हात

भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या मध्यमवर्गाच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्नही मोदी यांनी केला. ते म्हणाले की, ‘‘देशातील मध्यमवर्गाने नेहमीच प्रामाणिकपणे कर भरला, पण काँग्रेस राजवटीने त्या करातून गोळा झालेल्या महसूलाचा वापर करताना भ्रष्टाचार रोखला नाही. तो आम्ही रोखला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण, स्वयंपाकाचा गॅस, शिधा यासाठीचा निधी आम्ही लाभार्थीच्या खात्यात थेट जमा केला.’’

Story img Loader