प्रधानमंत्री जन धन योजनेच्या गुरुवारी झालेल्या उद्घाटनप्रसंगी अनुपस्थित राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी ही योजना म्हणजे ‘नव्या बाटलीतील जुनी दारू’ आहे अशी मल्लिनाथी केली. तसेच मोदी सरकार जुन्याच योजनेला नव्या नावाने आणून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
गुरुवारी देशभरात जन धन योजना लागू करण्यात आली. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जितन राम मांझी अनुपस्थित राहिले.
जन धन योजनेबाबत टीका करूनही मांझी यांनी गरिबांना बँक खाते उघडून देण्याची कल्पना चांगली असल्याचे नमूद केले. जन धन योजनेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान तसेच रालोआच्या नेत्यांकडून मांझी यांच्यावर टीका करण्यात आली त्याबद्दल विचारले असता मांझी म्हणाले की, जेहानाबादहून पाटण्याला येताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खूप उशीर झाला. आपण जाणीवपूर्वक कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलो नव्हतो असे सांगून ते म्हणाले की, पाटणा येथे वेळेत पोहोचलो असतो तर कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहिलो असतो.
काँग्रेसच्या काळात तसेच आमच्या काळातही ही योजना अस्तित्त्वात होती. विद्यमान केंद्र सरकार फक्त जन धन योजना हे नवे नाव देऊन प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे लागले असून आम्ही ही योजना प्रत्यक्ष कृतीत उतरवली होती, असेही मांझी यांनी सांगितले. गुरुवारी मुख्यमंत्री मांझी यांची बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अखेरीस केंद्रीय मंत्री पासवान यांनीच जन धन योजनेचे उद्घाटन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा