लवकरच चांगले दिवस येतील या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याची नरेंद्र मोदींनी खिल्ली उडवली. पंतप्रधानांच्या या विधानाशी आपण सहमत असून जास्त बोलायची गरज नाही असे सांगत, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेची संधी मिळेल असेच मोदींनी प्रवासी भारतीय संमेलनात सूचित केले.
निराश होण्याची आवश्यकता नाही, आगामी काळात चांगले दिवस येतील असा आशावाद पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांसमोर बुधवारी व्यक्त केला होता. पंतप्रधानांचे हे वक्तव्य वास्तवात उतरण्यासाठी चार ते सहा महिने थांबा असे मोदींनी सांगत अप्रत्यक्षपणे केंद्रात सत्तांतर होईल असा विश्वास व्यक्त केला. गेल्या दशकात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाने देशाची हानी झाली आहे. अर्थव्यवस्थेची गती मंदावणे, एका पाठोपाठ एक उघड झालेले घोटाळे, धोरणात सातत्याचा अभाव यांमुळे विकास मंदावला. लोकांचा सरकारवरचा आणि नेत्यांवरचा विश्वास कमी झाला. घोटाळ्यांची चर्चाच सतत सुरू आहे. त्यापेक्षा भ्रष्टाचार होणार नाही अशी व्यवस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण करण्याची गरज मोदींनी व्यक्त केली.
देशात बदल घडवण्यासाठी अनिवासी भारतीयांनी सहभाग द्यावा असे आवाहन मोदींनी केले. २०१९ मध्ये महात्मा गांधी यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष केंद्राने भव्य स्वरूपात साजरे करावे अशी सूचना मोदींनी केली. तसेच २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत आहेत. देशाचा र्सवकष विकास करून जगात अधिक सामथ्र्यशाली व्हावे यादृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
परदेशी नागरिकांना भारतभेटीवर येण्याचे प्रोत्साहन देण्यासह परदेशस्थ भारतीयांनी आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी भरीव कार्य करावे, असे आवाहन करून मोदी यांनी परदेशस्थ भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. भारतात १० जणांना पाठविण्यासाठी पावले उचलली तरी पर्यटनक्षेत्राला चालना मिळेल, असे आवाहन केले.