यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. वैद्यक, भौतिक आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर आज शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. इराणमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि तिथल्या महिलांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनल लढत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी या गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये मानवी हक्क आणि स्त्रियांवरील अत्याच्यारांविरोधात लढत आहेत. त्यांच्या लढ्याला सलाम करण्यासाठी त्यांना २०२३ चं शांततेचं नोबेल जाहीर करण्यात आलं आहे.
नर्गिस मोहम्मदी यांना इराण सरकारने आतापर्यंत १३ वेळा अटक केली आहे. तरी बलाढ्य इराण सरकार त्यांना रोखू शकलं नाही. उलट प्रत्येक कारवाईनंतर त्या अधिक आक्रमकपणे लढा देऊ लागल्या. त्यांना १५४ चाबकाचे फटके मारण्याची शिक्षादेखील झाली. या शिक्षेलादेखील त्यांनी हसत हसत तोंड दिलं. तसेच त्यांना ३१ वर्षांच्या तुरंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नर्गिस मोहम्मदी यांना जगातला सर्वोच्च मानला जाणारा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु, हा पुरस्कार स्वीकारायला त्या ओस्लोला (नॉर्वेची राजधानी) जाऊ शकणार नाहीत. कारण सध्या त्या तुरुंगात आहेत.
यंदाचं शांततेचं नोबेल जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं आहे की, नर्गिस मोहम्मदी यांचा संघर्ष खूप मोठा आहे. आपल्या लढाईच्या बदल्यात त्यांनी खूप मोठी किंमत मोजली आहे. फ्रंट लाइन डिफेंडर्स राइट्स ऑर्गनायजेशन या संघटनेसाठी त्या काम करत आहेत. या संघटनेनं म्हटलं आहे की, इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी सध्या तेहरानच्या एव्हिन तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. इराणी सरकारविरोधात खोटा प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
इराणमधल्या महिलांना सन्मानाने जगता यावं, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नर्गिस मोहम्मदी यांचा इराणी राजवटीविरोधात लढा सुरू आहे. मोहम्मदी या इराणी महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावणाऱ्या नियमांना आव्हान देतात. त्याविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलनं केली, आवाज उठवला. महिलांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी अधिकारांसाठी त्या तिथल्या राजवटीविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी नोबेल समितीने त्यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे.