आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांनी गुरुवारी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकावत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. अमीन यांच्या प्रवेशामुळे भाजपला सौराष्ट्र भागात मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जाते.
माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचा सौराष्ट्रात मोठा प्रभाव असून केशुभाईंनी पक्षत्याग करून गुजरात परिवर्तन पक्ष स्थापन केला आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. गुजरातमध्ये पटेल समाजाचा प्रभाव असून अमीन हेही पटेल समाजाचे आहेत. पटेल समाजात अमीन यांना मानणारे मोठय़ा संख्येने असल्याचे सांगण्यात येते. अमीन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मोदी यांची डोकेदुखी मोठय़ा प्रमाणावर कमी झाली असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अमीन हे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होण्याची स्वप्ने मोदी बघत आहेत. अमीन यांच्या प्रवेशामुळे लोकशाही बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करून मोदी यांनी अमीन यांचे स्वागत केले. अमीन हे युवावस्थेत असल्यापासून लोकसेवा करीत आहेत, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने केवळ जनतेचीच फसवणूक केली, असे नाही तर प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही फसवणूक केल्यामुळे काँग्रेसच्या घराणेशाहीवादी राजकारणाचा पराभव करणे आता महत्त्वाचे आहे, या शब्दांत मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली.
मागील सलग दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याची सबब देत अमीन यांना काँग्रेसश्रेष्ठींनी या वेळी उमेदवारी नाकारली होती. या निवडणुकीतही भाजपच विजयी होणार असल्याची खात्री असून मोदी हेही राज्यात आपल्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करतील. आता आपण भाजपसाठी काम करण्याचे ठरविले आहे, असे अमीन यांनी सांगितले.
राज्यात पक्ष उभारणीसाठी ज्या ज्येष्ठ नेत्यांनी काबाडकष्ट केले, त्यांना डावलून पक्षाने साधारण ओळख असलेल्या नेत्यांना निवडणुकीची तिकिटे दिल्यामुळे आपल्याला अपमानित झाल्यासारखे वाटले. श्रेष्ठींनीही ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप अमीन यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा