गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते बुधवारी नर्मदा कालव्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत नर्मदा कालवा फुटला आहे. यामुळे गुजरातमधील भाजपा सरकारची नाच्चकी झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं नर्मदा कालवा फुटल्याचा व्हिडीओ शेअर करत भाजपाच्या ‘गुजरात मॉडेल’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संबंधित व्हिडीओमध्ये नर्मदा कालवा फुटल्याचं दिसत असून कालव्यातील पाणी शेतात शिरलं आहे.
हेही वाचा- पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता, ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे नेते सरल पटेल म्हणाले की, “गुजरात सरकारने मांडवी, कच्छपर्यंत नर्मदा कालव्याचं काम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. उद्घाटनानंतर २४ तासांच्या आत त्याच नर्मदा कालव्याचा काही भाग फुटला आहे. त्यामुळे कच्छच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं पाणी त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरलं आहे. कारण कालवा फुटल्याने शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचं पीक नष्ट झाले आहे,” असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र काँग्रेसने देखील नर्मदा फुटल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “विकासाचं ‘गुजरात मॉडेल’… उद्घाटनाच्या २४ तासातच नर्मदा कालवा फुटला.” काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करत गुजरात सरकारच्या गलथान कारभारावर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “गुजरातमधील कच्छला पाणीपुरवठा करणारा नर्मदा कालवा कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या २४ तासात कालव्याचा एक भाग कोसळून गावे पाण्याखाली गेली आहेत. तसेच पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.