अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था शून्य गुरुत्वात काम करू शकणारा त्रिमिती मुद्रक (थ्री-डी प्रिंटर) अवकाशात तयार करणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीरांसाठी आवश्यक ते सामान पाठवले जाईल त्यासोबत त्रिमिती मुद्रकाचे सुटे भाग तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक घटक पाठवले जाणार असून गरजेनुसार हा त्रिमिती मुद्रक अवकाशातच तयार केला जाणार आहे. ‘मेड इन स्पेस’ या अंतराळसामग्री निर्मिती कंपनीने हा विशेष त्रिमिती मुद्रक तयार करण्याची ही योजना आखली असून पृथ्वीबाहेर अशा प्रकारे एखादे उपकरण तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्रिमिती मुद्रण शून्य गुरुत्वाला कशा प्रकारे करता येईल याचा प्रयोग यात अपेक्षित असून शून्य गुरुत्वात केल्या जाणाऱ्या अनेक प्रयोगांमध्ये त्यामुळे नवीन भर पडली आहे. ‘मेड इन स्पेस’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅरॉन केमर यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर नेहमीच जीवन-मरणाची लढाई लढत काही वेळा यंत्रांच्या दुरुस्त्याही करीत असतात. त्यापेक्षा त्यांना तिथल्या तिथे नवीन उपकरणे तयार करणे यातून शक्य होणार आहे. बहुतेक सर्व अंतराळ मोहिमांमध्ये पृथ्वीवरून बरीच उपकरणे अवकाशात पाठवली जातात. परंतु त्यात काही बिघाड झाल्यास त्यात दुरुस्ती करणे आव्हानात्मक असते. त्यामुळे आम्ही आता त्रिमिती मुद्रकाच्या मदतीने अवकाशातच या उपकरणांच्या रचनांचा छापील नमुना घेऊन त्यांची निर्मिती करता येईल.
नासाचे प्रशासक चार्लस बोल्डेन यांनी सांगितले, की मंगळासारख्या दूरवरच्या मोहिमांसाठी किंवा लघुग्रहांवर मोहीम नेण्यासाठी यंत्रसामग्रीचे वजन व आकारमान कमी करणे आवश्यक असते, ते या त्रिमिती मुद्रकाच्या निर्मितीतून साध्य होणार आहे कारण त्यांच्या आधारे विविध उपकरणांच्या संरचनांचे छापील नमुने घेऊन तेथेच ती तयार केली जातील. अर्थातच त्यातील पहिली सुरुवात ही या त्रिमिती मुद्रकापासून तयार होणार आहे. मागणीनुसार उपकरणे अवकाशात तयार केली जातील.
अवकाशातील कारखान्यांची ही सुरुवात आहे, मेड इन स्पेस या कंपनीच्या माध्यमातून पहिले उपकरण तेथे तयार होत आहे. यात तंत्रज्ञानातील प्रगतीची परमोच्चता साधली जात आहे, असे नासाचे सहायक प्रशासक मायकेल गझारिक यांनी सांगितले.
मेड इन स्पेस या कंपनीने त्रिमिती तंत्रज्ञानातील काही घटकांची चाचणी २०११ मध्ये शून्य गुरुत्वाच्या प्रयोगात घेतली होती, आता या वर्षी त्यांच्या आणखी चाचण्या केल्या जाणार आहेत. २०१४ च्या सुमारास या त्रिमिती मुद्रकाची अवकाशात निर्मिती केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा