NASA Astronauts Allowance and Salary: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नऊ महिने अंतराळात अडकले होते. केवळ दहा दिवसांसाठी अंतराळात गेले असताना काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना आणखी २७८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडावे लागले. त्यानंतर आता दोघेही पृथ्वीवर सुखरूप पोहोचले असून नासाच्या पुनर्वसन केंद्रात ते देखरेखीखाली आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका पत्रकार परिषदेत सुनील विल्यम्स आणि विल्मोर यांना मिळणाऱ्या भत्त्याबाबतचा प्रश्न विचारला गेला, त्यावर त्यांनी दिलेले मजेशीर उत्तर आता व्हायरल होत आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे मागच्या वर्षी जून महिन्यात अंतराळात गेले होते. तिथे काही दिवस संशोधन करून त्यांना पुन्हा पृथ्वीवर परतायचे होते. मात्र परतायला २७८ दिवसांचा उशीर लागला.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अंतराळवीरांना मिळणाऱ्या ओव्हरटाईम भत्त्याबाबतचा प्रश्न विचारला. यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला याबाबत कुणीही काही सांगितलेले नाही. जर भत्ता द्यायचा झाल्यास मी माझ्या खिशातून देण्यास तयार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, नासाच्या धोरणानुसार सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात अधिकचा काळ घालवावा लागला, त्याबद्दल त्यांना वेतन मिळणार नाही आहे. नासाचे अंतराळवीर हे अमेरिकेचे फेडरल कर्मचारी असतात आणि त्यांचे निश्चित वेतन ठरलेले असते.

याशिवाय अंतराळवीरांचा प्रवास, खाणे-पिणे आणि राहण्याची व्यवस्था नासाकडून होत असते. जर अतिरिक्त वेळ काम करावे लागले तर त्यांना दैनंदिन भत्ता केवळ ५ डॉलर्स (४३० रुपये) इतकाच मिळतो. याप्रमाणे विल्यम्स आणि विल्मोर यांनी अंतराळात घालविलेल्या २८६ दिवसांसाठी त्यांना केवळ १,४३० डॉलर्स म्हणजेच १ लाख २२ हजार ९८० रुपये अतिरिक्त मिरणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना आश्चर्याचा धक्का

पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा ही बाब लक्षात आणून दिली, तेव्हा तेही आश्चर्यचकीत झाले. “फक्त एवढेच?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “त्या दोघांनी ज्या परिस्थितीचा सामना केला, त्या तुलनेत हे काहीच नाही”, असेही ते म्हणाले.

नासाच्या अंतराळवीरांना आठवड्याचे ४० तास काम करावे लागते. यावेळी त्यांना कोणताही ओव्हर टाईम, आठवडी सुट्टी किंवा मोठ्या सुट्टीचे वेतन दिले जात नाही.

माध्यमांत आलेल्या बातम्यानुसार, सुनीता विल्यम्स यांना जीएस – १५ च्या श्रेणीनुसार वेतन दिले जाते. त्यांना १,५२,२५८ डॉलर्स (१ कोटी ३० लाख ९२ हजार ७२६) एवढा पगार मिळतो. याशिवाय आरोग्य विमा आणि गृह भत्ताही दिला जातो.

Story img Loader