NASA Astronaut Sunita Williams Monthly Salary: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे आता लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. दहा दिवसांसाठी अंतराळात गेल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे तब्बल १० महिने ते अंतराळात अडकून पडले होते. आता स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील इतर अंतराळवीरांसह सुनीता विल्यम्स आणि विल्मोर परतणार आहेत.
८ मार्च रोजी नासाने क्रू ९ सदस्यांच्या परतण्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाहिर केली. लवकरच क्रू १० आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचणार आहेत, ते पोहोचल्यानंतर क्रू ९ १६ मार्च रोजी अंतराळ स्थानकातून निघेल. नासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, क्रू ९ चे सदस्य १६ मार्च रोजी अनडॉक करतील.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना केवळ १० दिवसांच्या मिशनसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेले होते. पण तांत्रिक कारणांमुळे त्यांना अधिक काळ अंतराळात मुक्काम करावा लागला. हा वाढलेला मुक्काम नक्कीच त्रासदायक असला तरी यातून महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन करण्यात आले.
सुनीता विल्यम्स यांचे वेतन किती?
नासाच्या अंतराळवीरांना अमेरिकन सरकारच्या जनरल शेड्यूल (GS) वेतनश्रेणीनुसार अनुभव आणि मिशन असाइनमेंटवर आधारित GS-13 ते GS-15 श्रेणींमध्ये वेतन दिले जाते.
GS-13 अंतराळवीरांचे वेतन – या वेतनश्रेणीमध्ये असलेल्या अंतराळवीरांना वार्षिक ८१,२१६ डॉलर्स (साधारण ७० लाख रुपये) ते १०५,५७९ डॉलर्स (जवळपास ९२ लाख रुपये) पर्यंत वेतन मिळते.
GS-15 अंतराळवीरांचे वेतन – या वेतनश्रीणीनुसार वरिष्ठ अंतराळवीरांना भारतीय रुपयांमध्ये ७० लाख ते १.२७ कोटींपर्यंत वेतन मिळते.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, नासाच्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स या जीएस-१५ वेतनश्रेणीत मोडतात. त्यांना वार्षिक १,५२,२५८ डॉलर्स इतके वेतन मिळते. भारतीय रुपयांमध्ये हा पगार १.२६ कोटी रुपये इतका होतो.
सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती?
सुनीता विल्यम्स या माजी नौदल अधिकारी असून प्रतिष्ठित अंतराळवीर आहेत. नासा आणि अमेरिकन लष्करात त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतलेला आहे. ईटीनुसार, सुनीता विल्यम्स यांची एकूण संपत्ती ५ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
सुनीता विल्यम्स या ह्युस्टन, टेक्सास येथे राहतात. त्यांचे पती मायकेल जे. विल्यम्स फेडरल मार्शल आहेत.