सुपर टायगर
अंटाक्र्टिकावरील वातावणात असलेल्या वैश्विक किरणांच्या अभ्यासासाठी नासाने एक बलून पाठवला असून त्याने प्रदीर्घ काळ तरंगत राहण्याचा विक्रम केला आहे. या आकाराच्या बलूनने इतके प्रदीर्घ उड्डाण कधीच केले नव्हते. या बलूनला जोडलेल्या वैज्ञानिक उपकरणाचे म्हणजे पेलोडचे नाव सुपर ट्रान्स आयर्न गॅलेक्टिक रेकॉर्डर (टीआयजीइआर) असे असून तो बलून ४६ दिवस अंटाक्र्टिकावर तरंगत आहे व त्याने दक्षिण ध्रुवाच्या किमान तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. आता या बलूनने त्याचे उड्डाण समाप्त करण्यापूर्वी आणखी ८-१० दिवस निरीक्षणे नोंदवावीत व त्यात मॅकम्युरडो स्टेशनच्या जवळून एक फेरी मारावी अशी वैज्ञानिकांची अपेक्षा आहे. सुपर टायगरच्या अगोदरचा विक्रम २००५ मधला असून त्यावेळी बलून ४१ दिवस २२ तास तरंगत होता.
प्रकल्प कशासाठी ?
आपल्या आकाशगंगेतून पृथ्वीच्या दिशेने उच्च ऊर्जेचे वैश्विक किरण (कॉस्मिक रेज) येत असतात, त्यांच्या प्रवाहातील जड संयुगांची माहिती मिळवणे हा बलूनचा मुख्य हेतू आहे. या अभ्यासातून ऊर्जाधारी अणुकेंद्रके विश्वात कुठे निर्माण होतात व त्यांच्यात एवढी ऊर्जा कोठून येते हे समजणार आहे. हा बलून ८ डिसेंबर २०१२ रोजी अंटाक्र्टिकावरील मॅकम्युरडो स्टेशन येथून सोडण्यात आला होता. या बलूनचे आकारमान ३९ दशलक्ष घनफूट इतके प्रचंड आहे. त्याच्या मदतीने सहा हजार पौंडाचा सुपर टायगर पेलोड १,२७,००० फूट इतक्या उंचीवर तरंगत ठेवला आहे. हा पेलोड स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलच्या वजनाइतका आहे. विमानापेक्षा तो चार पट जास्त उंचीवर आहे.
नासाच्या खगोलभौतिकी बलूनची ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे. असे मोठे बलून दीर्घकाळ तरंगत ठेवून निरीक्षणे नोंदवणे हे अतिशय अवघड शास्त्र आहे.
जॉन ग्रन्सफील्ड, सहायक प्रशासक, विज्ञान मोहीम संचालनालय
हा बलून तयार करायला आम्हाला आठ वर्षे लागली आहेत. उड्डाणाच्या कालावधीचा विक्रम त्याने मोडला ही निश्चितच उत्कंठावर्धक बाब आहे. तो खरोखर सुपर टायगर आहे, कारण अजूनही वैज्ञानिक माहिती गोळा करण्याचे काम तो करीत आहे. तो अजून एक किंवा दोन आठवडे तरंगत राहू शकतो.
– देबोरा फेअरब्रदर, वैज्ञानिक बलून कार्यक्रम प्रमुख