वॉशिंग्टन : ‘नासा’ने अंतराळात प्रथमच जमा केलेले अशनीचे नमुने तब्बल सात वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर पोहोचले आहेत. ते वाहून आणणारी कुपी यूताह वाळवंटात उतरवण्यात आली. (सूर्याभोवती फिरणाऱ्या महाकाय खडकासारख्या घटकांना अशनी असे म्हणतात.) ऑसिरिस- रेक्स या अवकाशयातून पृथ्वीच्या कक्षेत सुमारे ६३ हजार मैलांवर हे नमुने सोडण्यात आले. त्यानंतर सुमारे चार तासांनी ही लहानशी कुपी एका लष्करी क्षेत्रात पडली. दरम्यान, ते यान पुन्हा दुसरे नमुने आणण्यासाठी रवाना झाले.
हेही वाचा >>> महिला आरक्षण २०३४ च्या आधी मिळू शकणार नाही; माजी केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा दावा
पृथ्वीवर पोहोचलेल्या या कुपीत बेनू या अशनीच्या दगडमातीचे किमान कपभर तरी नमुने असावेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पण कुपी उघडली गेल्यानंतरच त्याबाबत निश्चितपणे सांगता येईल. तीन वर्षांपूर्वी हे नमुने जमा करताना ते कुपीच्या झाकणात अडकले होते. याआधी केवळ जपानला असे अशनीचे नमुने आणता आले होते. काही मोहिमांतून त्यांना चमचाभर नमुने मिळाले होते.