नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर एकेकाळी पाणी वाहिल्याच्या खुणा सापडल्याचा निष्कर्ष जाहीर केल्यानंतर माहिती महाजालातील लोकप्रिय गुगल सर्च इंजिनने एक अनोखं डुडल साकारलं आहे. मंगळ ग्रह ग्लासमधून स्ट्रॉच्या सहाय्याने पाणी पितानाचे छायाचित्र गुगलच्या होमपेजवर साकारण्यात आले आहे. नासाच्या संशोधनाची दखल घेत गुगलने साकारलेले हे डुडल नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. डुडलवर क्लिक केल्यानंतर या संशोधनासंबंधी अधिकची माहिती गुगलने उपलब्ध करून दिली आहे.
एरवी कोरडा व धुळीने माखलेला, जैवहीन ग्रह वाटत असलेल्या मंगळावर अजूनही काही प्रमाणात ओलसरपणा आहे, असा दावा नासाने केला आहे. वैज्ञानिकांनी सोमवारी ही महत्त्वाची घोषणा केली असून त्यात आजही मंगळावर द्रव स्वरूपात पाणी असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे तेथे सूक्ष्मजीवसृष्टीच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

Story img Loader