चंद्रावर गेलेल्या शेवटच्या अपोलो यानानंतर तब्बल ४० वर्षांनी नासाने १४ व १५ क्रमांकाच्या चांद्रमोहिमेतील धूळशोधक यंत्राने घेतलेल्या मापनांमधील माहितीचे दस्तावेजीकरण केले आहे. डिजिटल स्वरूपातील ही माहिती असून ही माहिती गेली दीड वर्षे अभ्यासासाठी उपलब्ध झाली नव्हती, असे नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.
गोडार्ड केंद्राचे वैज्ञानिक एनएसएसडीसीचे माहिती विशेषज्ञ डेव्हीड विल्यम्स यांनी सांगितले की, अपोलो १४ व अपोलो १५ मोहिमातील या माहितीवर पहिल्यांदाच दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. चांद्र मोहिमेतील माहिती आता डिजिटल स्वरूपात साठवली असल्याने ती विविध संस्थांच्या वैज्ञानिकांना आधुनिक स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यावेळच्या मोहिमेत धूळ संकलन, तापमान व उच्च ऊर्जा वैश्विक कणांमुळे तसेच अतिनील किरणांमुळे होणारी हानी याविषयीच्या माहितीचा त्यात समावेश आहे. अपोलो ११ व अपोलो १२ या मोहिमांमध्येही अशीच उपकरणे वापरण्यात आली होती. या माहितीचे फेरसंकलन करणे हे एक मोठे आव्हान होते. माहितीचे हे दोन संच असून त्यांच्या मदतीने उपयोगी अशी मापने उपलब्ध होणार आहेत. सध्या ही माहिती एनएसएसडीसीच्या मायक्रोफिल्ममध्ये संकलित केलेली आहे व या दोन माहिती संचांची सांगड घालणेही गरजेचे आहे कारण त्यांचा कालावधी हा तंतोतंत जुळणारा नाही. फ्लोरिडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील मेरी मॅकब्राइड या संशोधिकेने या माहिती संकलनाचे काम पार पाडले आहे. नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑरबायटर (एलआरओ) या प्रकल्पातही चंद्रावरील धुळीवर संशोधन सुरू आहे. यात धुळीबाबत काही मापने घेण्यात आली असल्याचे एलआरओ प्रकल्पातील वैज्ञानिक रिच व्होनडार्क यांनी सांगितले.   

Story img Loader