अनंत विश्वात माणूस एकाकी आहे का.. त्याला कोणीही साथीदार नाही का.. या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपल्यासारखेच अन्य कोणीही नाही का.. या अनादी अनंत कालापासून सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आजवर अनेक मोहिमा आखल्या गेल्या. अंतराळात अनेक अवकाशयानं सोडण्यात आली. चंद्र, मंगळ, शुक्र, शनी अशा अनेक ग्रहांवर या मोहिमा थडकल्या. मात्र, मानवाचा साथीदार काही सापडला नाही. या मोहिमा आखण्यात अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था आघाडीवर आहे. आता याच नासाने ‘मिशन गुरू ग्रह’ आखले आहे. गुरूचा चौथा चंद्र ज्युपिटरवर प्रचंड प्रमाणात पाणीसाठा असल्याचा होरा नासातज्ज्ञांचा असून तेथे सजीवसृष्टी असल्याचाही अंदाज त्यांना आहे. त्यामुळेच आता नासाचे ‘मिशन युरोपा’ २०२१ मध्ये अवकाशात झेपावणार आहे.
गुरू ग्रहाला असलेल्या चार चंद्रांपैकी युरोपा नावाच्या चंद्राच्या पृष्ठभागावर नासाच्या अवकाशतज्ज्ञांना बर्फाचे भरमसाठ साठे आढळले आहेत. या बर्फाच्या नद्यांखाली पाण्याचे प्रवाह असण्याची शक्यता असून सजीवसृष्टीचे काही अंश त्यात मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच युरोपावर स्वारी करण्याची योजना नासाने आखली आहे. त्यासाठी २०२१चा मुहूर्त ठरवण्यात आला असून नासाच्या मुख्यालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती या मिशनचे उद्गाते डेव्हिड सेन्सके यांनी दिली आहे. दोन दशलक्ष डॉलरचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला असून २०२१ साली त्यासाठी अंतराळयान अवकाशात झेपावेल असे सेन्सके यांनी सांगितले. ३१०० किलोमीटरचे क्षेत्रफळ असलेल्या युरोपाचा पृष्ठभाग खडकाळ असला तरी त्या ठिकाणी भूगर्भात मोठे पाणीसाठे असल्याचा नासातज्ज्ञांचा होरा आहे.                        

Story img Loader