भारताच्या मंगळ मोहिमेवर अमेरिकेतील ‘शटडाऊन’चा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, दिशादर्शक यंत्रणेच्या (डीएसएन) माध्यमातून मार्स ऑरबायटरला मदत सुरुच राहील,असे नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने स्पष्ट केले. भारताचे मार्स ऑरबायटर यान येत्या २८ ऑक्टोबर रोजी दुपारी सोडण्यात येणार आहे. त्याची ‘लाँच विंडो’ १९ नोव्हेंबपर्यंत चालू राहणार आहे. आर्थिक पेचप्रसंगामुळे नासाचे ‘डीप स्पेस नेटवर्क’ उपलब्ध होण्याबद्दल आणि पर्यायाने भारताच्या मंगळ मोहीमेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र नियोजनाप्रमाणे आमचे सहकार्य कायम राहिल, असे नासाने स्पष्ट केले. त्यामुळे येत्या २८ ऑक्टोबरला देशाची पहिली मंगळ मोहीम नियोजित वेळेनुसार होईल, असे स्पष्टीकरण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने दिले आहे.
अमेरिकेत संरक्षण खात्यातील कर्मचारी रुजू
अमेरिकेत आर्थिक पेचप्रसंगाच्या आजच्या सहाव्या दिवशी पेंटॅगॉन मधील संरक्षण खात्यातील घरी पाठवण्यात आलेल्या चार लाख कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सांगण्यात आले आहे.‘शटडाऊन’मुळे घरी पाठवण्यात आलेल्या आठ लाख कर्मचाऱ्यांनाही या कालावधीतील वेतन देण्याचा ठराव ओबामा प्रशासनाने संमत केला.