नासाच्या दोन अंतराळयानांनी पृथ्वी व चंद्राची अतिशय नयनरम्य अशी कृष्णधवल व रंगीत छायाचित्रे टिपली आहेत. अंतराळात लाखो मैल अंतरावरून ही छायाचित्रे घेतली असून ती प्रसारित करण्यात आली आहेत.
नासाने शनीच्या दिशेने पाठवलेल्या कॅसिनी अंतराळयानाने पृथ्वी व चंद्र यांची छायाचित्रे दीड अब्ज किलोमीटर अंतरावरून टिपली आहेत.
बुधाकडे पाठवलेल्या मेसेंजर यानाने ९.८ कोटी किलोमीटर अंतरावरून कृष्णधवल छायाचित्र टिपले आहे. कॅसिनीने टिपलेल्या छायाचित्रात पृथ्वी व चंद्र हे ठिपक्यासारखे दिसत आहेत. पृथ्वी फिकट निळी तर चंद्र पांढरा दिसत आहे. शनीच्या कडय़ांमध्ये असल्यासारखे ते दिसले. कॅसिनीच्या अत्याधुनिक कॅमेऱ्याने प्रथमच लांबून पृथ्वी व तिचा उपग्रह असलेल्या चंद्राची छायाचित्रे टिपली आहेत. पृथ्वीची आंतरग्रहीय अंतरावरून छायाचित्रे टिपण्यात येणार असल्याची पूर्वसूचनाही देण्यात आली होती. विशेष म्हणजे शनी, पृथ्वी, तिचा चंद्र यांची ही सर्व छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्यात आली आहेत. नासाच्या पॅसाडेना येथील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेतील कॅसिनी प्रकल्प वैज्ञानिक लिंडा स्पिलकर यांनी सांगितले की, या छायाचित्रात पृथ्वी ही ठिपक्यासारखी दिसते आहे, त्यात कुठलेही खंड दिसत नाहीत. १९ जुलैला ती टिपण्यात आली आहेत. कॅसिनीच्या छायाचित्रामुळे पृथ्वी अवकाशाच्या पसाऱ्यात किती छोटी आहे हे जाणवते. पृथ्वीची आपल्या सौरमालेबाहेर जाऊन काढलेली छायाचित्रे ही दुर्मीळ असतात, कारण त्यात सूर्य व पृथ्वी एकमेकांच्या जवळ दिसत असतात. सूर्य अंतराळयानाच्या दृष्टीने तात्पुरता शनीमागे दडल्याने कॅसिनी यानाला हे छायाचित्र घेता आले अन्यथा त्याच्या कॅमेऱ्यालाही हानी पोहोचू शकते.
मेसेंजरच्या प्रतिमेत पृथ्वी व चंद्र प्रत्यक्षात ठिपक्याएवढेच दिसतात, पण ते मोठे असल्याचे भासते. अंधूक पदार्थाचे छायाचित्र टिपताना त्याच्याकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश टिपणे आवश्यक असते.
नासाच्या यानांतून पृथ्वी-चंद्राचे नयनरम्य चित्रण
नासाच्या दोन अंतराळयानांनी पृथ्वी व चंद्राची अतिशय नयनरम्य अशी कृष्णधवल व रंगीत छायाचित्रे टिपली आहेत. अंतराळात लाखो मैल अंतरावरून ही छायाचित्रे घेतली असून ती प्रसारित करण्यात आली आहेत.

First published on: 24-07-2013 at 01:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa releases stunning images of earth moon and rings of saturn in the same frame