Sunita Williams returns to Earth Video : तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. याबरोबरच मुळात आठ दिवसांसाठी नियोजित असणारी ही मोहिम नऊ महिन्यानंतर संपुष्टात आली आहे. दरम्यान नासाने अंतराळवीर जमीनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले. फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले. जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या.
Splashdown confirmed! #Crew9 is now back on Earth in their @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/G5tVyqFbAu
— NASA (@NASA) March 18, 2025
नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरूवातीला अवघ्या एक आठवड्याच्या कालावधीसाठी अंतराळात गेले होते. पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा मुक्काम वाढला होता. त्यानंतर आता स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी त्यांच्या परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १०व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली होती. ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Welcome home, #Crew9@NASA_Astronauts Nick Hague, Suni Williams, Butch Wilmore, and cosmonaut Aleksandr Gorbunov splashed down off the coast of Florida at 5:57pm ET (2127 UTC), concluding their scientific mission to the @Space_Station: https://t.co/DFWxQIiz6O pic.twitter.com/VQu3DhpTUJ
— NASA (@NASA) March 19, 2025
सुनी विल्यम्स, बुच विल्मोर यांच्याबरोबर अंतराळवीर निक हेग, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील पृथ्वीवर परतले असल्याची माहिती नासाने दिली आहे. तर विल्यम्स आणि विल्मोर यांनी ऐकूण २८६ दिवस अंतराळात घालवले आहेत. म्हणजेच एकूण नियोजित दिवसांपेक्षा २७८ दिवस जास्त काळ त्यांना अंतराळात राहावे लागले. या लांबलेल्या मोहिमेदरम्यान त्यांनी ४,५७६ वेळी पृथ्वीला फेरी मारली आणि पृथ्वीवर सुरक्षितपणे परतण्याआधी जवळपास १९५ दशलक्ष किलोमीटर प्रवास केला