नासा म्हणजे नॅशनल अॅरोनॅटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही संस्था पुढील महिन्यात चंद्रावर छोटय़ा मोटारीच्या आकाराचे यांत्रिक शोधयान पाठवणार असून, त्याचा उद्देश चंद्रावरील वातावरणाची अधिक माहिती मिळवणे हा आहे. चंद्राच्या वातावरणाच्या तुलनेने पातळ थराची रचना व त्याचे घटक यांचे नेमके चित्र त्यामुळे उलगडणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला हे यान नासाच्या व्हर्जिनिया स्पेस कोस्ट येथील तळावरून सोडले जाणार आहे. तेथून पृथ्वीच्या कक्षेबाहेर होणारे हे पहिलेच उड्डाण आहे.
नासाने म्हटले आहे, की ल्युनर अॅटमॉस्फिअर अँड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्स्प्लोअरर (लाडी) असे या यानाचे नाव असून, चंद्राचे हवामान व तेथील आकाशात उडणारी धूळ याविषयी अधिक माहिती त्याच्या निरीक्षणातून मिळणार आहे.
चंद्राच्या या संशोधनातून मोठे लघुग्रह, बुध व इतर बाहय़ग्रहांचे चंद्र यांच्याविषयी माहिती उपलब्ध होईल.
चंद्रावरील विरळ वातावरणासारखे वातावरण सौरमालेत इतर ग्रह किंवा उपग्रहांवर असण्याची शक्यता नेहमीच जास्त आहे त्यामुळे त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर आपल्या सौरमालेची उत्क्रांती व त्यातील घटकांवर यामुळे नवीन प्रकाश पडेल, असे नासाचे सहायक प्रशासक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले. या मोहिमेची वैशिष्टय़े म्हणजे मिनोटॉर-५ अग्निबाणाची पहिलीच चाचणी या मोहिमेत होत आहे त्याचबरोबर व्हर्जिनिया स्पेस कोस्ट येथून पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडले जाणारे हे पहिलेच यान आहे.उड्डाणानंतर ‘लाडी’ यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल व नंतर ४० दिवसांच्या कालावधीनंतर ते माहिती पाठवण्यास सुरुवात करील. सुरुवातीचे तीस दिवस या यानावरील यंत्रसामग्री व्यवस्थित सुरू होण्यास लागतील. त्यात उच्च शक्ती लेसर दळणवळण प्रणाली असून तिची क्षमता पृथ्वीवरील फायबर ऑप्टिक प्रणालीइतकी आहे.
कसे आहे ‘लाडी’ चांद्रयान
‘लाडी’ यानाचा आकार बससारखा आहे. ते वजनाने हलक्या असलेल्या कार्बन संमिश्राचे बनवलेले आहे. त्याचे वस्तुमान ५४७.२ पौंड ते ८४४.४ पौंड दरम्यान राहील. बससारख्या आकाराची असे यान यापुढे इतरही ठिकाणी पाठवता येतील. अतिशय कमी खर्चात बनवलेले, पण उत्तम दर्जाचे असे हे चांद्रयान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा