संयुक्त अरब अमिरातीतून नासाच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या एकमेव स्पर्धक मुलीने सुचवलेले प्रयोग अवकाशात करून बघितले जातील, असे नासाने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी भारतीय आहे.
नासाच्या तरूण वैज्ञानिक कार्यक्रमात तिने हे प्रयोग सुचवले होते. प्रेरण पै असे या मुलीचे नाव असून ती शारजा येथे दिल्ली प्रायव्हेट स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकते. एकूण १०० प्रयोग अवकाशात केले जाणार असून, २६ जूनपासून हे प्रयोग अवकाशात केले जाणार आहेत. यात ७५ अमेरिकी मुलांनी सुचवलेले प्रयोग आहेत व इतर जगातील २५ विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचा समावेश आहे.
 पै ही वैज्ञानिक होण्यास इच्छुक असून ती नेहमी नासाच्या विद्यार्थी कार्यक्रमात भाग घेते. नासाच्या ‘क्युब्ज इन स्पेस’  हा कार्यक्रम मे महिन्यात जाहीर करण्यात आला होता; त्यात जगातील ११ ते १४ वयोगटातील मुलांकडून प्रायोगिक पेलोडच्या संकल्पना मागवण्यात आल्या होत्या.
‘‘हे प्रयोग सुचवताना मला खूप विचार करावा लागला. माझ्या विज्ञान शिक्षकांचा सल्ला मी घेतला व त्यांनीही चाकोरीबाहेर विचार करण्यास उत्तेजन दिले. एकदा माझ्या प्रयोगांची निवड झाल्यानंतर नासाने एक संच पाठवला, त्याच्या आधारे तो पेलोड तयार करून तो पाठवला. या यशाने मला आनंद वाटला, त्यामुळे नासाचे आभार मानणारे पत्रही आपण पाठवले,’’ असे प्रेरणाने सांगितले.
सादर केलेले प्रयोग
अवकाशात करायच्या प्रयोगांसाठी तिने दोन प्रयोग सुचवले. त्यात ‘टू स्टिक ऑर नॉट टू स्टिक’ व ‘टाइम अँड प्लेजर’ अशी त्यांची नावे आहेत. पहिल्या प्रयोगात वातावरणीय दाबाच्या अभावी वेगवेगळे चिकट पदार्थ (अ‍ॅढेसिव)अवकाशात कसे गुणधर्म दाखवतात, यावर आधारित हा प्रयोग असून त्यात थर्मोकोलच्या १२ तुकडय़ांच्या घनाकृतीवर प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळे चिकट पदार्थ जसे मॉडेलिंगची माती, वॅक्स, सेलो टेप, धातूची तार, दोरा, डिंक व सुपर ग्लू (अधिक चिकट डिंक) लावण्यात आले आहेत.दुसऱ्या प्रयोगात दोन छोटय़ा बाटल्या आहेत; एक प्लास्टिकची तर एक काचेची आहे. त्या मातीच्या बुचाने बंद केल्या असून घनाकृतीत ठेवल्या आहेत. यात या बाटल्या वातावरणीय दाबाला कसे तोंड देतात हे पाहिले जाईल, त्या तुटतात की तशाच राहतात हे बघावे लागेल. जेव्हा हे प्रयोग अवकाशात केले जातील तेव्हा त्यांचे निष्कर्ष आम्हाला कळवले जाणार आहेत,असे तिने सांगितले.

Story img Loader