नवी दिल्ली : देशात करोनाचा हाहाकार कमी झाला आहे. मात्र, करोना विरोधातील लसीकरण मोहिम अद्यापही सुरू आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करून जनतेला करोनापासून सुरक्षित केलं जात आहे. त्यात करोना लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ‘भारत बायोटेक’च्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “भारताच्या करोना विरुद्धच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. भारत बायोटेकच्या नाकवाटे देण्यात येणाऱ्या लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपात्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. १८ वर्षावरील सर्वांना ही लस देता येणार असून, करोना विरूद्धच्या आमच्या लढ्याला आणखी मजबूत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने करोना विरोधातील लढ्यात विज्ञान, संशोधन आणि मानवी संसाधनांचा उपयोग केला. पंतप्रधानांचे नेतृत्व, विज्ञावर आधारित दृष्टीकोन आणि सबका प्रयासने आम्ही करोनावर मात करू,” असेही आरोग्यमंत्री मांडविया यांनी म्हटलं.
नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात. करोनाचा विषाणू फुफ्फुसांना सर्वाधिक धोका पोहचवतो.