ज्यांच्या वातावरणात पाणी आहे असे पाच ग्रह नासाच्या वैज्ञानिकांना सापडले असून, तेथे पाणी असल्याच्या काही खुणा दिसत आहेत. आपल्यापेक्षा वेगळय़ा सौरमालेतील काही ताऱ्यांभोवती फिरत असलेल्या काही बाहय़ग्रहांवर पाणी असल्याचे यापूर्वीच दिसून आले असून, आता हा असा पहिलाच अभ्यास असा आहे ज्यात बाहय़ग्रहांवर पाण्याचे पुरावे सापडले आहेत असे नासाने म्हटले आहे.  
   ज्या पाच ग्रहांवर पाणी सापडले आहे त्यात वास्प १७ बी, एचडी २०९४५८ बी, वास्प १२ बी, वास्प १९ बी, एक्सओ १ बी हे ग्रह त्यांच्या जवळच्या ताऱ्यांभोवती फिरताना दिसले. त्यांच्यावर पाणी असल्याचे पुरावे हबल दुर्बिणीच्या मदतीने मिळाले आहेत. या पाण्याच्या खुणा वेगवेगळय़ा दिसतात. वास्प १७ बी हा ग्रह फुगीर असून एचडी २०९४५८बी या ग्रहावर पाण्याचे अधिक सबळ पुरावे मिळाले आहेत. वास्प १२ बी, वास्प १९ बी व एक्सओ १ बी या ग्रहांवर पाण्याचे सातत्यपूर्ण पुरावे मिळाले आहेत.
नासाच्या मेरीलँड येथील ग्रीनबेल्ट येथे असलेल्या गोडार्ड अंतराळ उड्डाण केंद्राचे ग्रह वैज्ञानिक अवी मँडेल यांनी सांगितले, की आम्हाला तेथे पाण्याच्या अनेक खुणा सापडल्या आहेत. बाहय़ग्रहांवरील वातावरणात पाणी असल्याचे आढळल्याने तप्त व थंड ग्रहांवरील पाण्याच्या अस्तित्वाची तुलना केली करण्याचे एक नवे जग खुले झाले आहे असे मँडेल यांनी सांगितले. नासाने म्हटले आहे, की आताचे हे पाण्याचे अस्तित्व सापडलेले पाचही ग्रह तप्त गुरूच आहेत व त्यांच्या कक्षा त्यांच्या मातृताऱ्याभोवती फार जवळ होत्या. पण हे ग्रह धुरकट दिसत आहेत, याचे आश्चर्य वाटते.
हबल दुर्बिणीच्या निरीक्षणातून असे दिसून येत आहे, की पाण्याच्या या खुणा फार अंधूक व न दिसण्यासारख्याच आहेत असे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे हिथर न्यूस्टन यांनी म्हटले आहे. तप्त गुरूसदृश ग्रहांवर ढगाळ, धुरकट वातावरण हे नेहमीचेच लक्षण आहे.  
संशोधन सुरूच ठेवणार
दरम्यान नासाने असे म्हटले आहे, की मंगळ, लघुग्रह, चंद्र व सौरमालेतील इतर घटकांचे संशोधन नासा चालूच ठेवणार आहे. प्लुटोच्या अभ्यासासाठी न्यू होरायझन, सेरीस बटू ग्रहाच्या संशोधनासाठी डॉन, बुधाच्या शोधासाठी मेसेंजर तर शनिसाठी कॅसिनी मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमा चालू आहेत. मंगळावर सध्या दोन रोव्हर गाडय़ा असून आणखी एक लँडर व रोव्हर येत्या काही वर्षांत सोडल्या जाणार आहेत.

Story img Loader