मंगळाच्या पृष्ठभागाच्या अभ्यासासाठी नासाने पाठविलेल्या ‘मार्स रोव्हर क्युरिसिटी’ने तेथील खडकांच्या पृथ्थकरणाच्या कार्यामध्ये पहिल्यांदा यश मिळविले आहे. तेथील खडकांवरील धूळ झटकण्यासाठी रोव्हरवरील ‘ब्रश’ कार्यरत झाले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मार्स रोव्हर मंगळावर सक्रिय झाल्याचे मानले जात आहे. मंगळावरच्या पृष्ठभागावर रोव्हरला नेमून देण्यात आलेल्या भागातील धूळ रोव्हरमधील यंत्रणेने काढून टाकल्याचे ‘नासा’ने पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
या ब्रशद्वारे खडकांवरील धूळ काढून टाकल्यानंतर रोव्हरवरील विज्ञान यंत्रणेद्वारे खडकांचे पृथ्थकरण पुढे जाणार आहे. रोव्हर यानाशी जोडलेल्या अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्टोमीटर आणि कॅमेराद्वारे आता यान कार्यरत राहील. धुळीच्या थरामुळे येथील खडकांच्या अभ्यासामध्ये अडचण येत होती.
आता ती दूर झाली असून, नवी माहिती हाती लागणार आहे. धूळ काढणाऱ्या यंत्रणेसाठी हा भाग अत्यंत खडतर होता. रोव्हरमधील यंत्रणा आता पुढच्या काही आठवडय़ांमध्ये मंगळावरील खडकांना तोडण्यास सक्रिय होईल.
मंगळावरील खडकांच्या पृथ्थकरणासाठी लक्ष्य योग्यरीत्या पूर्ण करणे आवश्यक होते. यानाचा यंत्रणेला कुठलाही धक्का न बसवता यानाने लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे यानाचे काम यशस्वीरीत्या सुरू झाल्याचे नासाच्या डिआना त्रजिलो यांनी स्पष्ट केले.
न्यूयॉर्कमधील हनीबी रोबोटिक्स या कंपनीने रोव्हरवरील धूळ साफ करणारे यंत्र तयार केले आहे. यापूर्वी मंगळावर पाठविण्यात आलेल्या यानासाठीही याच कंपनीने यंत्रणा तयार केली होती. खडकांवरील धूळ काढून टाकण्याची, तसेच खडक फोडण्याचीही मुभा या यंत्रात आहे.
काय आहे मार्स रोव्हर ?
१९७१ पासून मंगळाच्या अभ्यासासाठी ‘मार्स रोव्हर’ पाठविण्यात येत आहे. २६ नोव्हेंबर २०११ रोजी क्युरॅसिटी हे ताजे मार्स रोव्हर यान मंगळावर पाठविण्यात आले. मंगळावरील खड्डे, पाणी, पृष्ठभाग आणि खडक यांचा अभ्यास ते करीत आहे.