मोहिमेची वैशिष्टय़े काय?
* अत्यंत कमी म्हणजे १७.७ अब्ज डॉलर इतका अंदाजे खर्च
* एसएलएस व ओरायन वाहनांचा अतिशय परिणामकारक वापर
* चंद्रावर निवासी तळ तयार करणार
* लघुग्रह मोहिमेची रंगीत तालीम
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत बराक ओबामा यांच्या विजयानंतर नासाच्या अंतराळ कार्यक्रमाला गती मिळणार असून आता चंद्रावर पुन्हा अंतराळवीर पाठवण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली असून नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा हे लवकरच नवी महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर माणसाच्या वास्तव्यासाठी एक खास निवास केंद्र बांधण्याची नासाची योजना आहे. अंतराळात खोलवर मानवी अस्तित्व असावे यासाठी त्याचा उपयोग होणार असून २०२५ पर्यंत लघुग्रहाची सफर करण्याची योजनाही आखता येईल त्यासाठी चंद्रावरील या निवासी केंद्राचा वापर करता येईल.
नवीन महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमेला ओबामा यांनी मंजुरीही दिली आहे. परंतु अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार मिट रॉम्नी यांचा विजय होऊ शकतो ही शक्यता गृहित धरून ओबामा यांनी तूर्त चांद्रमोहिमेची नवी योजना जाहीर केली नाही, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक व अंतराळ धोरणविषयक तज्ज्ञ जॉन लॉगसन यांनी म्हटले आहे.
नासाने चांद्रमोहिमेची नवी मांडणी केली असून त्यात पृथ्वी-चंद्र एल२ हा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबत घोषणा केली जाईल असा अंदाज लॉगसन यांनी वर्तवला आहे. रिपब्लिकन उमेदवार मिट रॉम्नी यांनी नासाच्या मोहिमा व अंतराळ धोरणाची दिशा बदलण्याचे सूतोवाच केले होते, पण ते निवडून आले नाहीत.
नासाने १७.७ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या खर्च मर्यादेत सर्व उद्दिष्टय़े साध्य करण्याचे ठरवले आहे. हा खर्च २०१३ च्या संघराज्य अर्थसंकल्पात प्रस्तावित केला आहे. नासाच्या मोहिमेने आर्थिक भार पडणार नाही तर त्यात लघुग्रह मोहिमेपूर्वी अधिक कार्यक्षमतेने एसएलएस व ओरायन या वाहनांचा वापर केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा