नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीला (बग्गीसारखी यांत्रिक गाडी) मंगळावर नायट्रोजनचा अंश सापडला आहे. कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टीसाठी नायट्रोजन हा पोषक घटक मानला जातो व आता मंगळावर नायट्रोजन सापडल्याने तेथे एकेकाळी जीवसृष्टी असल्याचा दावा करण्यासाठी आणखी एक पुरावा मिळाला आहे.
सँपल अ‍ॅनॅलिसिस अ‍ॅट मार्स (सॅम) या क्युरिऑसिटी रोव्हरवरील उपकरणाने मंगळावर नायट्रोजनचा अंश असल्याचे प्रथमच शोधून काढले आहे. मंगळावरील खडक तापल्याने त्यातून नायट्रोजन वायू बाहेर पडतो असा अंदाज आहे.
मंगळावर नायट्रोजन ऑक्साईडच्या रूपात नायट्रोजन सापडला असून तो खडक तापल्याने नायट्रेटच्या विघटनातून तयार होतो. नासाच्या मते नायट्रेटच्या रेणूत ज्या स्वरूपात नायट्रोजन  असतो त्याच स्वरूपात तो सजीवांमध्येही असतो, त्यामुळे मंगळावर जर नायट्रोजन असेल तर तेथे एकेकाळी जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
नायट्रोजन हा सजीवांच्या विकासासाठी आवश्यक असतो किंबहुना तो जीवसृष्टीच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे, डीएनए व आरएनए या रेणूंमध्ये नायट्रोजन असतो. डीएनए व आरएनए या प्रकारच्या रेणूंमध्ये जनुकीय माहिती साठवलेली असते. केसांच्या रचनेसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांमध्येही नायट्रोजन हा घटक असतो.
नासाच्या मेरीलँड येथील गोडार्ड अवकाश उड्डाण केंद्राच्या जेनीफर स्टर्न यांच्या मते मंगळावरील गेल विवरात जैवरासायनिक स्वरूपात नायट्रोजन सापडणे, ही प्राचीन काळी तेथे जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला दुजोरा देणारी घटना आहे.
नासाच्या पथकाला मंगळावर वाऱ्याने वाहून आलेल्या वाळू व धुळीत रॉकनेस्ट या ठिकाणी नायट्रेट्सचे नमुने सापडले आहेत व जॉन क्लेन व येलोनाइफ बे मधील कम्बरलँड येथे उत्खनन केले असता तेथेही नायट्रेट्सचे नमुने सापडले आहेत. रॉकनेस्ट येथील नमुने हे धुळीने वाहून आलेल्या नमुन्यांसारखेच असून ते मंगळावर जास्त भागात विखुरलेले असावेत असा अंदाज आहे. जिथे उत्खनन करण्यात आले तेथे नायट्रेटचे प्रमाण ११०० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) इतके आढळून आले आहे. हे नमुने प्रथम तापवण्यात आले, नंतर त्यातून नायट्रेट्सचे रेणू बाहेर पडले व ते वायूरूपातून सॅम यंत्राकडे वळवण्यात आले. नायट्रोजन असलेली संयुगे मास स्पेक्ट्रोमीटर व गॅस क्रोमॅटोग्राफ या दोन यंत्रांनी शोधता येतात. इतर नायट्रोजन संयुगांबरोबरच मंगळावर नायट्रोजन ऑक्साईड (एनओ) चे अंश तीन ठिकाणी आढळून आले आहेत. नायट्रेट म्हणजे नायट्रोजन अणू तीन ऑक्सिजन अणूंना जोडून तयार होणारी संयुगे असतात. जास्तीत जास्त नायट्रोजन ऑक्साईड नायट्रेट्समधून मिळतो. मातीचे नमुने तापवल्यानंतर त्यातून ते बाहेर पडतात. सॅम यंत्राने तेथे शोधलेल्या इतरही काही संयुगांपासून नायट्रोजन मिळू शकतो. या संशोधनानुसार नायट्रेट्स हे मंगळावर आहेत व त्यांचे प्रमाणाही जास्त आहे, असे स्टर्न यांचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा