Naseeruddin Shah Brother: गुरुग्राममध्ये, सायबर चोरट्यांनी निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे भाऊ जमीर उद्दीन शाह यांची सुमारे ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पालम विहार येथील रहिवासी निवृत्त लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांनी त्यांच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, त्यांनी मसुरीमध्ये राहण्यासाठी एका वेबसाइटवर हॉटेल बुक केले होते. यासाठी त्यांना ९,३९८ रुपये जमा करावे लागले होते. यानंतर त्यांनी गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधला. १ मार्च रोजी त्यांनी या नंबरवर संपर्क साधला तेव्हा फोन करणाऱ्याने त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले.
कॉल करणाऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ९,३९८ रुपये ट्रान्सफर केले, परंतु पैसे जमा झाल्याचा कोणतीही पावती त्यांना देण्यात आली नाही. यानंतर त्यांनी पुन्हा त्याच नंबरवर संपर्क साधला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्यांना पुन्हा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणला. त्यांना संभाषणात गुंतवून आरोपीने सहा वेळा थोडे थोडे असू करून ९४ हजार रुपये जमा करायला लावले. त्यानंतरही त्यांना याची पावती मिळाली नाही. म्हणून जमीर उद्दीन शाह यांनी पुन्हा त्याच नंबरवर संपर्क साधला. यावेळी त्यांना त्यांचा डेबिट कार्ड नंबर आणि त्याचा पिन नंबर विचारण्यात आला. यानंतर संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
काय म्हणाले जमीर उद्दीन शाह?
या प्रकरणी बोलताना जमीर उद्दीन शाह म्हणाले “मला त्यांना कर म्हणून ९३९८.२८ रुपये द्यायचे होते. म्हणून मी गुगलवर त्यांचा कस्टमर केअर नंबर शोधला आणि त्या नंबरवर कॉल केला होता. मी १ मार्च २०२५ रोजी या नंबरवर संपर्क साधला आणि त्यांनी मला यूपीआय द्वारे ९३९८.२८ रुपये जमा करण्याची विनंती केली. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर याची कोणतीही पावती मला मिळाली नाही. तेव्हा मी पुन्हा त्याच नंबरवर संपर्क साधला आणि माझ्याशी बोलत असलेल्या व्यक्तीने आणखी पैसे ट्रान्सफर करण्याचा आग्रह धरला, म्हणून मी माझ्या अॅक्सिस बँक खात्यातून आणखी ६ वेळा त्याला पैसे पाठवले.” याबाबत द प्रिंटने वृत्त दिले आहे.