या देशात एका गाईच्या मृत्यूला पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे. ‘देशात हे विष पसरलंय आणि त्याला योग्य वेळी थांबवणं खूप गरजेचं आहे,’ असंही ते म्हणाले.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते. कारण त्यांचा कोणता धर्म नाहीये. आम्ही आमच्या मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. कारण चांगलं किंवा वाईट याचं धर्माशी काही देणंघेणं नाही असं मला वाटतं. काय योग्य, काय अयोग्य हे माझ्या मुलांना मी शिकवलं आहे. उद्या माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरलं आणि तुमचा धर्म कोणता असं विचारलं तर ते काय उत्तर देणार याची मला चिंता वाटते. कारण त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नसेल.’

बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह सुमित नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येच्या चौकशीऐवजी गोहत्येच्या आरोपींना पकडण्याच्या दृष्टीकोनातून तपास सुरू असल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशच्या ८३ माजी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Story img Loader