Rahul Gandhi : नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी स्फोट होऊन दोन अग्निविरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत लष्कराकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता विरोधकांकडून पुन्हा एकदा अग्निपथ योजनेवरून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही या योजनेवरून मोदी सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या घटनेबाबत भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी अग्निविरांच्या मृत्यूबाबत शोकही व्यक्त केला आहे. “ ”नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत यांचं निधन वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Rahul Gandhi : “किती कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावर सरकारला जाग येईल?”, रेल्वे अपघाताच्या घटनेवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

मोदी सरकारला विचारले तीन प्रश्न

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला तीन प्रश्नही विचारले आहेत. “या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तर देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरलं आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही शहीद जवानाला आर्थिक मदत दिली जाते, त्याप्रमाणे गोहिल आणि सैफतच्या कुटुंबियांना वेळेवर भरपाई मिळेल का?” असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना, “अग्निवीरांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जर दोन्ही सैनिकांच्या जबाबदाऱ्या आणि बलिदान समान आहे, तर ते शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का?”, असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. तसेच “अग्निपथ योजना ही लष्कराबरोबर अन्याय आणि आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एका जवानाचे आयुष्य दुसऱ्या जवानापेक्षा अधिक मूल्यवान आहे का? याचं उत्तर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी द्यायला हवं”, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

अग्निवीर योजनेविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचं केलं आवाहन

दरम्यान, राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही देशातील तरुणांना केलं आहे. “आपण सगळे मिळून या अन्यायाविरोधात उभे राहूया. भाजपा सरकारची अग्रिवीर योजना रद्द करण्यासाठी आणि देशातील तरुणांचं आणि लष्कराचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी जय जवान आंदोलनात आजच सहभागी व्हा”, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा – Rahul Gandhi : “हरियाणातील नेत्यांनी पक्षापेक्षा…”, विधानसभेतील पराभवानंतर राहुल गांधींचा संताप; चिंतन समिती स्थापन करत म्हणाले…

नाशिकमध्ये नेमकी काय घटना घडली?

तोफखाना दलाचे देशातील प्रमुख प्रशिक्षण केंद्र देवळाली कॅम्प येथे आहे. या ठिकाणी दलात दाखल होणाऱ्या अग्निविरांसह जवानांना तोफखाना केंद्रात तर अधिकाऱ्यांना तोफखाना स्कूलमध्ये विविध अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे गुरुवारी दुपारी तोफखान्याचा सराव सुरु असताना स्फोट झाला. गोहिल विश्वराज सिंग (२०) आणि सैफत शित (२१) हे दोन अग्निविरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.