‘बदलाचे वारे हे राजकारणातून नव्हे तर समाजातून येत असतात. सत्ताधाऱ्यांमध्ये बदल करून फारसे काही साध्य होत नाही. त्यामुळेच हिंदुत्वाच्या आधारावर समाजात योग्य बदल घडवून आणण्याची खरी गरज आहे. त्यासाठी योग्य नेता केंद्रस्थानी असायलाच हवा’ असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित येथील एका कार्यक्रमात बोलताना भागवतांनी हिंदुत्वाधिष्ठित समाजाची रचना आणि त्यासाठी लागणारे नेतृत्व यांवर उपस्थितांचे ‘बौद्धिक’ घेतले. आपला देश अधिकाधिक सक्षम कसा होईल याचीच संघाने काळजी घेतली आहे आणि यापुढेही ती तशीच घेत राहील, असे सांगतानाच संघ समाजातही योग्य बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघाबद्दल अनेकांच्या मनात किंतु आहेत. त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. त्यांच्या आधारावरच काही लोक संघाबद्दल काहीही कंडय़ा पिकवत असतात. मात्र, त्याकडे संघ फारसे लक्ष न देता आपले कार्य करत राहतो म्हणूनच आतापर्यंतची वाटचाल शक्य झाली असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव, भाजपचे उपाध्यक्ष सी. पी. ठाकूर  आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुत्व हे हिंदुस्थानचे मर्म असून त्याची ओळखही आहे. त्यामुळेच हिंदुत्वाच्या आधारावरच समाजाची उभारणी करणे हे आद्यकर्तव्य असल्याचे संघाचे म्हणणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा