वैवाहिक जीवनातील मतभेदांवरून २००८मध्ये पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करणारा लक्ष्मीनिवास नेरुसु या संगणक तज्ज्ञास अमेरिकन न्यायालयाने जन्मठेप ठोठावली. हत्याकांडानंतर ४६ वर्षीय नेरुसु भारतात पळून गेला होता. भारताने त्याला अमेरिकेच्या हवाली केले होते. तीन जुलैपासून नेरुसु याची सजा सुरू होणार असून त्याला पॅरोलही दिला जाणार नाही. नेरुसुने मख्ख चेहऱ्याने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली न्यायालयात दिली. नेरुसुने प्रथम पत्नीची हत्या केली. त्यानंतर मुले घरी येण्याची वाट तो पाहात होता. त्याची १४ वर्षांची मुलगी घरी येताच तिची आणि त्यानंतर १२ वर्षांच्या मुलाची हत्या करून तो हैदराबादला पळून गेला होता.
‘पत्नीशी बळजबरी हा बलात्कार नव्हे’
नवी दिल्ली : पतीने पत्नीशी केलेला शरीरसंग, मग तो बळजबरीने असला तरी, तो बलात्कार ठरत नाही, असा निकाल देत दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता केली.
आफताब आलम असे या पतीचे नाव आहे. २० जुलै २०१२ रोजी त्याने आपल्या आत्याच्या घरी मौलवींसमक्ष या महिलेशी निकाह केला होता. त्याआधी १९ जुलै २०१२ रोजी गुंगीचे औषध शीतपेयात घालूनही त्याने आपला विनयभंग केला होता, असे या महिलेने याचिकेत म्हटले होते. तसेच लग्नानंतर त्याने अनेकवार बळजबरी केल्याने त्याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवला होता. या महिलेचा युक्तीवाद विसंगत आणि संशयास्पद असल्याचे सांगत अशी बळजबरी हा बलात्कार होत नाही, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विरेंदर भट यांनी निकालात सांगितले.
तीन नक्षलवाद्यांना अटक
रायपूर : नक्षलवाद्यांच्या कारवायांनी गांजलेल्या छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्य़ात शुक्रवारी तीन कडव्या नक्षलवादी अतिरेक्यांना अटक झाली. यात बद्रु ऊर्फ कारिया हेमला (२८), वट्टी रामा (३०) यांना भैरमगढमधील आठवडी बाजारातून सकाळी अटक झाली तर नेलनार येथील आठवडी बाजारात बलराम तामो (२८) या नक्षलवाद्यास अटक झाली. पावसाळ्यात जंगलात राहणाऱ्या साथीदारांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी हे तिघे आठवडी बाजारात आले होते.
‘केदारनाथ’प्रकरणी श्वेतपत्रिकेची मागणी
डेहराडून : उत्तराखंडमधील केदारनाथ तीर्थक्षेत्रात गेल्या वर्षी ओढवलेल्या नैसर्गिक उत्पातानंतर झालेली जीवितहानी आणि सरकारी मदतकार्य तसेच तेथील सद्यस्थिती याबाबत श्वेतपत्रिका तयार करावी, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याकडे केली आहे. दुर्घटनेला एक वर्ष उलटूनही कोसळलेल्या काही दरडी तशाच असून तेथे मानवी सांगाडे हाती लागत असल्याचा भाजपचा आरोप आहे.
‘ग्रीनपीस’विरोधात आदिवासींची निदर्शने
सिंगरौली : महान कोल लिमिटेड प्रकल्पाला विरोध करीत असलेल्या ‘ग्रीनपीस’ या पर्यावरणवादी संस्थेच्या येथील कार्यालयाबाहेर शुक्रवारी आदिवासींनी जोरदार निदर्शने केली. प्रकल्पबाधित चार गावांतील आदिवासींनी ‘ग्रीनपीस चले जाव’चे घोषणाफलक उंचावले होते. ग्रीनपीस सारख्या पर्यावरणवादी संस्थांना गुप्तचर विभागाने विकासविरोधी ठरविल्याचा अहवाल दिला आहे तसेच आजची निदर्शने म्हणजे कंपन्यांची नवी खेळी आहे, असा आरोप ग्रीनपीसच्या प्रिया पिल्लै यांनी केला आहे.
सिलिंडर स्फोटानंतर आगीत चौघांचा अंत
कोलकाता : शहरातील पार्क सर्कस भागात तिजाला येथे एका घरात शुक्रवारी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला तर १३ जण भाजून जखमी झाले. यातील दहाजण ७० टक्के भाजले आहेत. आठ अग्निशामक बंबांनी ही आग विझविली.
लोकसेवा परीक्षेत काश्मीरची भरारी
श्रीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जम्मू आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी यंदाही लक्षणीय यश मिळविले आहे. जम्मू विभागातील सहा तर काश्मीर खोऱ्यातील चार विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले. श्रीनगरचा आबिद सादिक भट (३३) हा राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेला तर देशभरात २७व्या क्रमांकावर आलेला विद्यार्थी ठरला आहे.  
‘अनाथाश्रमा’तून  २२ मुलांची सुटका
कोल्लम : केरळातील बेकायदेशीर अनाथाश्रमात डांबलेल्या २२ मुलांची पोलिसांनी शुक्रवारी सुटका केली. यातील १८ मुले झारखंडची असून बिहार आणि केरळातील प्रत्येकी दोन मुले आहेत. परदेशी मदत मिळविण्यासाठी काही बेकायदेशीर अनाथाश्रम चालविले जात असल्याचा तर्क असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा