भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेला लवकर सुरुवात होण्याची शक्यता नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानवर दहशतवादाचा ठपका ठेवून भारत काश्मीरच्या प्रश्नावरून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे.
सरताझ अझिझ यांनी वार्ताहरांना सांगितले की, भारताने चर्चेची प्रक्रिया खंडित केली असल्याने चर्चेला पुन्हा सुरुवात करण्याची जबाबदारी भारताची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या ४० वर्षांपासून चर्चा केली जात आहे आणि तरीही काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच या प्रश्नात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मध्यस्थ असावा, असे पाकिस्तानला वाटते, असेही अझिझ म्हणाले.

‘भारत-चीन सीमा प्रश्नावर लवकर तोडगा शक्य’
 बीजिंग : भारत आणि चीनमध्ये बहुमतातील सरकार असल्याने दोन देशांमधील सीमा प्रश्नावर त्वरेने करार होऊ शकतो, कारण त्याबाबतची पूर्वतयारी यापूर्वीच पूर्ण झालेली आहे, असे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी म्हटले आहे. गेल्या तीन दशकांत सीमा भागांत शांतता आहे, गोळीबाराचा एकही प्रकार घडलेला नाही. मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आल्याने दोन्ही देशांमध्ये याबद्दल भावनिक वातावरण वाढले आहे, असे मेनन यांनी पेकिंग विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.या प्रश्नाबद्दल भयानक आणि उलटसुलट चर्चा माहितीच्या महाजालावर सुरू आहे,  अशा जगात आपण आहोत आणि त्यामुळेच हा प्रश्न लवकर निकाली काढणे उचित ठरेल, असे आमचे म्हणणे आहे, असेही मेनन म्हणाले.

नवाझ शरीफ यांना न्यायालयाचा इशारा
इस्लामाबाद, : पाकिस्तानने ५ डिसेंबपर्यंत कायमस्वरूपी मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली नाही तर पंतप्रधान नवाझ शरीफ आणि राष्ट्रीय असेंब्लीतील विरोधी पक्षनेते सय्यद खुर्शिद शाह यांच्यावर नोटिसा बजावण्यात येतील, असा इशारा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कायमस्वरूपी मुख्य निवडणूक आयुक्तांची ५ डिसेंबपर्यंत नियुक्ती न केल्यास ८ डिसेंबर रोजी शरीफ आणि शाह यांच्यावर नोटिसा बजावण्याचा न्यायालय विचार करील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कायमस्वरूपी आयुक्त नियुक्त करण्याबाबतच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश नसिरूल मुल्क यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. आयुक्तांची नियुक्ती ५ डिसेंबपर्यंत केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यास अॅटर्नी जनरल सलमान बट अपयशी ठरल्याचे ‘डॉन’ने म्हटले आहे.

इसिसच्या म्होरक्याची पत्नी,मुलास अटक
 बैरूत : ‘इसिस’च्या एका नेत्याची पत्नी आणि मुलास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती लेबनॉनच्या दोघा ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्याकडे बनावट ओळखपत्र होते आणि त्यांना १० दिवसांपूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेली महिला इसिसचा नेता अबू बकर अल-बगदादी याची एक पत्नी असल्याची माहिती मिळत असली, तरी अधिकाऱ्यांनी त्याबाबत अधिक तपशील दिला नाही. सदर महिला सीरियाची नागरिक आहे.परदेशी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने सीरियाच्या सीमेवर सदर महिला आणि तिच्या मुलास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ‘अस-सफीर’ या लेबनॉनच्या दैनिकाने प्रथम दिली.

खोटय़ा फेसबुक खात्याबाबत तक्रार
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांच्या प्रमुखांच्या नावाने  खोटी फेसबुक खाती काढण्यात आल्याबाबत दूरसंचार अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान खाते व पाकिस्तान दूरसंचार नियामक आयोग यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे.
   लष्कर प्रमुख राहील शरीफ व आयएसआयचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर, इतर अधिकारी जनरल हारून अस्लम, जनरल आसीफ हारून यांच्या नावाने खोटी फेसबुक खाती काढण्यात आल्याचे ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

जेब बुश यांचे उमेदवारीचे संकेत
वॉशिंग्टन : अमेरिकेची २०१६ मध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक आपण लढवू, असे फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर व माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू बुश यांचे पुत्र जेब बुश यांनी सांगितले. ते म्हणाले, की आपण ही निवडणूक लढवणार आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. बुश यांनी सांगितले, की परराष्ट्र धोरण आक्रमक असले पाहिजे व लष्कराची फेरबांधणी करून गुप्तचर क्षमता वाढवित जिहादी हल्ले टाळले पाहिजेत.

Story img Loader