कोळसा घोटाळ्याच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मूळ पदावर पाठवणी करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयला दिला. या घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून संबंधित अधिकाऱ्याला काम पूर्ण झाल्यावर त्याच्या मूळ पदावर जाण्यासाठी न्यायालयाची अनुमती घ्यावी लागेल, असेही सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्पष्ट केले. या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या तीन पोलीस महानिरीक्षकांपैकी एक असलेले व्ही. मुरगेशन यांनी आपल्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने, उत्तराखंडमधील आपल्या मूळ पदावर जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे पीठाने वरील आदेश दिला. आवश्यक असलेली कामगिरी आपण पूर्ण केलेली नाहीत, असे असताना मूळ पदावर जाण्याची इच्छा व्यक्त केलीत, हे कसे शक्य आहे, प्रथम दिलेली कामगिरी पूर्ण केली पाहिजे, २०१३ पर्यंत तपास पूर्ण करण्याचे आश्वासन आपण तिघांनी दिले होते, आता ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे पीठाने स्पष्ट केले आहे.

खऱ्या भारतीय नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्र देणार -राजनाथ
नवी दिल्ली : खरे भारतीय नागरिक कोण, याबाबतच्या माहितीचा समावेश असलेला राष्ट्रीय लोकसंख्या दस्तऐवज सरकारच्या वतीने तयार करण्यात येत असून या नागरिकांना टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. देशात बेकायदेशीरपणे होणाऱ्या घुसखोरीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी वरील घोषणा केली. खरा भारतीय नागरिक कोण आणि कोण नाही, याची खातरजमा करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागणार आहेत, असेही राजनाथ सिंग म्हणाले. राष्ट्रीय लोकसंख्या दस्तऐवज तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल आणि त्याद्वारे भारतीय नागरिक कोण आणि कोण नाही ते निश्चित केले जाईल. खऱ्या भारतीय नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्रे देण्यात येतील, असे राजनाथ सिंग म्हणाले. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपणही घालण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितल़े

यूपीएससी परीक्षेच्या गुणपत्रिका १९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन उपलब्ध
नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेच्या गुणपत्रिका यूपीएससी संकेतस्थळावर ऑनलाइन टाकण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात या परीक्षेचा निकाल लागला होता. २०१३ मध्ये जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते ते डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट यूपीएससी डॉट गव्ह डॉट इन या संकेतस्थळावर त्यांच्या गुणपत्रिका बघू शकतात. जे विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत त्यांचाही निकाल टाकण्यात आला आहे. १९ ऑगस्टपर्यंत या गुणपत्रिका पाहण्यास उपलब्ध असतील असे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. २०१३च्या परीक्षेत ११२२ विद्यार्थी यशस्वी झाले होते, त्या परीक्षेचा निकाल १२ जूनला लागला होता. मुख्य परीक्षा २६ मे २०१३ रोजी घेण्यात आली. एकूण ७७६५६५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते व त्यातील ३२३९४९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले व १४९५९ विद्यार्थी पात्र ठरले. मुख्य परीक्षा डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आली होती. एकूण ३००३ विद्यार्थ्यांना एप्रिल-जूनमध्ये व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलावण्यात आले होते.

पाकिस्तानाच्या हवाई हल्ल्यात १३ दहशतवादी ठार
इस्लामाबाद : उत्तर वझिरिस्तान प्रांतात सुरक्षा दल आणि तालिबान दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असतानाच मंगळवारी पाकिस्तान हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या हल्ल्यात काही परदेशी दहशतवाद्यांसह १३ दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे सात छुपे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचा दावा लष्कराचे प्रवक्ते मे. जन. असीम सलीम बजवा यांनी केला. उत्तर वझिरिस्तानातील डेगन येथे हा हल्ला करण्यात आला. या कारवाईला ‘ऑपरेशन झर्ब-ए-अझ्ब’ असे नाव देण्यात आले असून स्थानिक आणि परदेशी दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई १५ जून रोजी सुरू करण्यात आली. सदर कारवाई सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४०० दहशतवादी आणि २० सैनिक ठार झाले, असे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी मोहीम हाती घेतली असल्याचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी सांगितले.

लंडनच्या पार्लमेंट चौकात महात्मा गांधींचा पुतळा उभारणार
नवी दिल्ली : असहकार चळवळ, सविनय कायदेभंग अशा अहिंसात्मक मार्गानी ब्रिटिश सत्तेच्या नाकीनऊ आणणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा ब्रिटनमध्येच उभारला जाणार आहे. लंडन येथील पार्लमेंट चौकामध्ये २०१५ च्या पूर्वार्धात गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. जगभरातील लोकांना अहिंसात्मक पद्धतीने नागरी हक्कांच्या लढय़ासाठी प्रेरणा देणाऱ्या गांधीजींचा पुतळा उभारणार असल्याची माहिती सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री विल्यम हेग आणि अर्थमंत्रालयाचे चँसेलर जॉर्ज ऑसबॉर्न यांनी दिली. गांधीजींचा अहिंसेचा वारसा आजही कालसुसंगत आहे. सामान्य माणसांमधील असामान्य शक्तीचे गांधीजी हे मूर्तस्वरूप आहेत आणि म्हणूनच पार्लमेंट चौकात अनेक मान्यवर राजकीय नेत्यांच्या पंक्तीत बसवून त्यांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे या मंत्र्यांनी सांगितले. गांधीजींचा पुतळा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकशाहीचे सर्वात मोठे स्मारक ठरेल, अशी आशा भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने व्यक्त केली आहे.

बोको हरामच्या तावडीतील ६० मुलींची सुटका
मैदुगरी : नायजेरियात बोको हराम या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या मुली व महिलांपैकी ६० जणींनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नायजेरियाच्या सुरक्षा दलांनी व अधिकाऱ्यांनी मात्र या मुलींचे बोरनो राज्याच्या तीन खेडय़ातून २२ जूनला अपहरण झाल्याचाच इन्कार केला होता. चिबोक स्थानिक सरकारचे अध्यक्ष पोगू बिट्रस यांनी सांगितले की, गुरुवारी व शुक्रवारी किमान ६० महिला व मुलींनी अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. ज्या महिला व मुली परत आल्या आहेत त्यांच्याकडे प्रतिनिधी पाठवून या बातमीची खात्री करून घेतली आहे. सुटका झालेल्या काही महिला व त्यांचे कुटुंबीय लासा येथे रुग्णालयात आहेत. बोरनो राज्याची राजधानी असलेल्या मैदगुरीचे नेते अब्बास गावा यांनी सांगितले की, शुक्रवारी ६३ महिला व मुलींनी त्यांचे अपहरणकर्ते लष्करावर हल्ले करण्यात गर्क असताना पलायन करण्यात यश मिळवल़े

Story img Loader