कोळसा घोटाळ्याच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मूळ पदावर पाठवणी करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयला दिला. या घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून संबंधित अधिकाऱ्याला काम पूर्ण झाल्यावर त्याच्या मूळ पदावर जाण्यासाठी न्यायालयाची अनुमती घ्यावी लागेल, असेही सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्पष्ट केले. या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या तीन पोलीस महानिरीक्षकांपैकी एक असलेले व्ही. मुरगेशन यांनी आपल्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने, उत्तराखंडमधील आपल्या मूळ पदावर जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे पीठाने वरील आदेश दिला. आवश्यक असलेली कामगिरी आपण पूर्ण केलेली नाहीत, असे असताना मूळ पदावर जाण्याची इच्छा व्यक्त केलीत, हे कसे शक्य आहे, प्रथम दिलेली कामगिरी पूर्ण केली पाहिजे, २०१३ पर्यंत तपास पूर्ण करण्याचे आश्वासन आपण तिघांनी दिले होते, आता ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे पीठाने स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा