भारतातील प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळुशिल्प विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मॅथ्यू रॉय डेबर्थस् या त्यांच्या संघसहकाऱ्यासह पटनायक यांना हे विजेतेपद मिळाले आहे. २०१४ ची वाळुशिल्प विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील दुहेरी गटाचे विजेतेपद पटनायक यांना मिळाले आहे. ‘ताज महाल – प्रेमाचे प्रतीक’ या त्यांच्या वाळुशिल्पास हा बहुमान प्राप्त झाला आहे. वाळुशिल्पांचा भरविण्यात आलेला हा पहिलाच विश्वचषक. पटनायक आमि मॅथ्यू यांनी स्पर्धेत ‘ताजमहाल – शहाजहान आणि मुमताज’ यांचे शिल्प उभे केले होते. पटनायक यांनी एकेरी स्पर्धेतही ‘जनमताचा पुरस्कार’ पटकावला. ‘झाडे वाचवा, भविष्य वाचवा’ या संकल्पनेवर पटनायक यांनी हे शिल्प तयार केले होते.
युक्रेन सैन्याचा बंडखोरांवर हल्ला
क्यीव्ह : रशियन समर्थक बंडखोरांवर मंगळवारी युक्रेन सैन्याने जोरदार हल्ला चढवला. युरोपियन देशांकडून दहा दिवसांची शस्त्रसंधी पुढे कायम राखण्याच्या प्रयत्नांना बंडखोरांनी दाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.  पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी सोमवारी रात्री उशिरा राष्ट्राला उद्देशून केलेल्या भावनिक भाषणात बंडखोर स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आहेत; परंतु देशविघातक कारवाया घडवून आणण्यासाठी रशियाकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा केल्याचा आरोपही केला.
इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या २८
चेन्नई : येथील बहुमजली इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या २८ वर गेली आहे. मंगळवारी आणखी आठ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. या वेळी तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत २६ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे. यातील महेश नावाच्या एका तरुणाला ढिगाऱ्याखालून काढण्यात आल्यानंतर त्याने  अद्याप अनेकजण आत गाडले गेले आहेत आणि ते जिवंत असल्याचे सांगितले.
उंट : राजस्थानचा राज्य प्राणी
बिकानेर : वाळवंटातील जहाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंटाला राजस्थानचा राज्य प्राणी म्हणून घोषित करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला. युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे आणि राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिकाधिक मजबूत करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. आता या प्राण्याच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्राण्याची तस्करी आणि स्थलांतर यावर र्निबध घातले जातील, असे संसदीय कामकाजमंत्री राजेंद्र राठोड यांनी सांगितले.
रॉल्फ हॅरिस दोषी
लंडन : ब्रिटनचा ज्येष्ठ करमणूककार रॉल्फ हॅरीस याला लैंगिक छळाच्या खटल्यात मंगळवारी दोषी ठरवण्यात आले. १९६८ ते १९८६ या काळात हॅरिसने चार मुलींवर १२ वेळा लैंगिक हल्ला केला होता. लैंगिक छळातील एक पीडित ही त्याच्या बालमित्राची मुलगी होती. ८४ वर्षीय हॅरिसला न्यायालय दोषी ठरवत असून शुक्रवारी त्याला शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.
दर्डा यांच्यासह दोन कंपन्यांच्या मालमत्तांवर जप्ती
नवी दिल्ली : कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी ‘मनी लॉण्डरिंग’ कायद्यान्वये सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेसचे खासदार विजय दर्डा आणि नागपूरस्थित त्यांच्या अन्य एका सहयोगी कंपन्यांची २४.५० कोटी रुपयांची मालमत्ता मंगळवारी जप्त केली. मे. आसेरा बांका पॉवर लिमिटेड आणि जेएएस इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपन्यांचे समभाग जप्त करण्यासंदर्भात ‘मनी लॉण्डरिंग’ प्रतिबंधक कायद्यान्वये सक्तवसुली संचालनालयाने आदेश जारी केले. याप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागील वर्षी दाखल केलेल्या एफआयआरच्या अनुषंगाने संचालनालयाने स्वतंत्र गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा