मलेशियन एअरलाइन्समागील शुक्लकाष्ट अद्याप संपण्याची लक्षणे नाहीत़ गेल्या काही महिन्यांत याच एअरलाइन्सचे एक विमान बेपत्ता झाल्याची आणि एक विमान अतिरेक्यांनी पाडल्याच्या घटना घडल्या होत्या़ त्यानंतर बुधवारी याच एअरलाइन्सच्या एका विमानाने थायलंडमधील विमानतळावरून उड्डाण करताच त्याच्या सहवैमानिकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आह़े एसएल ८५३७ या विमानाने १५२ प्रवाशांना घेऊन हात याई विमानतळावरून उड्डाण केल़े त्यानंतर काही वेळातच डच नागरिक असलेला सहवैमानिक दगावल्याची घटना घडली़ त्यामुळे विमान तातडीने वळवून विमानतळावर आणण्यात आले आणि सहवैमानिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आल़े परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल़े सुदैवाने या गडबडीत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही़
घाघ्रा नदीने बिहारमध्ये धोक्याची पातळी ओलांडली
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसोबतच बिहार राज्यही पूर परिस्थितीशी झुंज देत असताना येथील महत्त्वाची नदी असलेल्या घाघ्राने बिहारमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आह़े सिवान जिल्ह्यातील दाराऊली येथे बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास नदी पूरसदृश स्थितीत वाहत होती, असे जलस्रोत मंत्रालयाकडून सांगण्यात आल़े सकाळी या नदीच्या पाण्याची पातळी ६१.२४ मीटर होती आणि त्यात सातत्याने वाढ होत होती़ धोक्याच्या पातळीहून ही पातळी ०.४२ मीटरने अधिक होती़ परंतु नदीच्या याआधीच्या सर्वाधिक पातळीच्या नोंदीपेक्षा ही पातळी कमीच होती़
व्यापाऱ्यांच्या संपामुळे केरळमधील व्यवहार विस्कळीत
तिरुवनंतपुरम :विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाचा निषेध नोंदविण्यासाठी केरळमधील शेकडो व्यापाऱ्यांनी बुधवारी आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे राज्यातील आर्थिक व्यवहार मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाले.केरळमधील ‘केरळ व्यापारी व्यवसायी एकोपान समिती’ ही व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असून या संघटनेच्या छत्राखाली आलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी एक दिवसाच्या आंदोलनाचे आवाहन केले होते. या संघटनेत राज्यातील मोठय़ा आणि लहान उद्योजकांसह घाऊक तसेच अन्य व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. आपल्या मागण्यांकडे सर्वाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्रमुख शहरांतील व्यापाऱ्यांनी मोर्चे काढले होते. आमच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असा इशारा समितीचे नेते नसरुद्दीन यांनी कोझिकोडे येथे दिला.
जिहादींना कतारची मदत; जर्मनीचा आरोप
बर्लिन : सीरिया आणि इराकमधील जिहादींना कतार आर्थिक मदत करीत असल्याचा आरोप जर्मनीचे विकासमंत्री ग्रेड म्युलर यांनी केला आहे.एका चित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कतारवर टीका केली. व्हाइस चान्सलर आणि अर्थमंत्री सिगमर गॅब्रेल यांनीही या आठवडय़ात देशाचा उल्लेख न करता जिहादींना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा मुद्दा उपस्थित केला होता. जिहादींशी इराकचे कुर्द संघर्ष करत असून, त्यांना शस्त्रास्त्रे देण्याबाबत जर्मनी येत्या काही दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसऱ्या देशातील संघर्षांत जर्मनीने शस्त्रे पुरवायची नाहीत असा जर्मनीचा नियम आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.