माओवादी प्रभावित छत्तीसगढमधील दांतेवाड जिल्ह्यात निमलष्करी दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन ‘कोब्रा जवान’ जखमी झाले आहेत़ अरानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाट जंगलातून मंगळवारी पहाटे नक्षलविरोधी मोहीम आटोपून जवान परतत असताना ही चकमक झडली, अशी माहिती दांतेवाडचे पोलीस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी सांगितल़े
हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना अटक
लॉस एंजेलिस: माध्यमिक शाळेत मोठय़ा प्रमाणावर हत्यासत्र घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना लॉस एंजेलिस भागात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. साऊथ पॅसाडेना येथील एका शाळेत हे कृत्य करण्याची या दोघांची योजना होती. मात्र, शाळेच्या अधिकाऱ्यांकडून यासंबंधी वेळेतच माहिती मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. हे दोघे जण या शाळेचे विद्यार्थी असून त्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे सावध होऊन अधिकाऱ्यांनी पोलिसांना सावध केले. शाळेचे तीन कर्मचारी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मारण्याचा कट या दोघांनी आखला होता.
‘ब्राझिलमधील बिल आमदार भरतील’
पणजी: अलीकडेच ब्राझील येथील फुटबॉल सामन्यासाठी झालेल्या प्रवासाचा खर्च संबंधित आमदार स्वत: करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधिमंडळात मंगळवारी दिली. या आमदारांचा दौरा खासगी स्तरावर असल्यामुळे ही चर्चा आता येथेच थांबविण्यात यावी, असेही आवाहन पर्रिकर यांनी केले. आपल्या दौऱ्यासाठी झालेल्या खर्चाची रक्कम हे आमदार भरणार असल्यामुळे तो खासगी दौरा म्हणून समजण्यात यावा. या विषयावर चर्चा करू नये, असे पर्रिकर म्हणाले. या दौऱ्यासंबंधी वितंडवाद सुरू होण्यापूर्वी आमदारांसाठी खरेदी करण्यात आलेली तिकिटे राज्य सरकारने काढली होती. परंतु ही तिकीटे रद्द केली असती तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते, असेही त्यांनी सदनात सांगितले.
आसारामच्या याचिकेवर सुनावणी
नवी दिल्ली: स्वयंघोषित गुरू बापू आसाराम याने तब्येतीच्या कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मान्य केले. आसाराम हा सध्या बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूरच्या तुरुंगात आहे. डॉक्टरांचे वैद्यकीय पथक नेमून आसारामच्या प्रकृतीची तपासणी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या पीठाने जोधपूरच्या एस. एन. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना आदेश दिला.
पार्थ मित्रांना मेंदू संशोधनासाठी अनुदान
न्यूयॉर्क: अमेरिकेतील भारतीय मेंदू वैज्ञानिक पार्थ मित्रा व फ्लोरिन अलबेन्यू यांना अध्यक्ष बराक ओबामा यांनी मानवी मेंदूचा नकाशा तयार करण्यासाठी अनुदान मंजूर केले आहे. या अंतर्गत न्यूरोअॅनॉटॉमिस्ट ही कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली प्रणाली विकसित केली जाणार असून तिच्या मदतीने मेंदूतील पेशींचे प्रकार, मेंदूतील रचना यांचा अभ्यास करता येणार आहे. हे दोन्ही वैज्ञानिक नॅशनल सायन्स फाउंडेशनचे आहेत.
नेपाळात पुराचे ११३ बळी
काठमांडू: पूर आणि भूस्खलनाने गांजलेल्या नेपाळमधील मृतांचा आकडा आता ११३ वर पोहोचला आह़े या प्रपातात बेपत्ता झालेल्या १२७ जणांच्या शोधाचे प्रयत्न नेपाळ शासनाने अधिक तीव्र केले आहेत़ पश्चिम नेपाळमधून मंगळवारी आणखी सहा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘भारताविरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही’
कोलंबो: श्रीलंकेत वास्तव्यास पाकिस्तानी नागरिकांकडून भारतविरोधी कारवाया होत असल्याच्या संशयामुळे पाकिस्तानात त्यांना पाठवून देण्यात येत असतानाच कोणत्याही परिस्थितीत आपल्या भूमीवरून भारताविरोधातील दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा श्रीलंकेने भारताला मंगळवारी दिला. भारतविरोधी कारवाया करण्यासाठी श्रीलंका आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही, असे आश्वासन श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री जी. एल. पेईरीस यांनी दिले.
श्रीलंकेचे अध्यक्ष महिन्द्र राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पेईरीस बोलत होते. भारताला आम्ही उपरोक्त आश्वासन वारंवार दिले असल्याचा दावा त्यांनी या बैठकीत केला.
संक्षिप्त : नक्षलींशी चकमकीत ३ जवान जखमी
माओवादी प्रभावित छत्तीसगढमधील दांतेवाड जिल्ह्यात निमलष्करी दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन ‘कोब्रा जवान’ जखमी झाले आहेत़
First published on: 20-08-2014 at 12:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National and international news in short