राजधानीत सध्या धावत असलेल्या ‘ई-रिक्षा’ बेकायदाच असल्याचे स्पष्ट करून या रिक्षांना नियमित करण्यासंबंधी केंद्र सरकार नियमावली करीत नाही, तोपर्यंत या रिक्षांवरील बंदी यापुढेही कायमच राहील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. ‘कायद्यान्वये ज्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्यास अनुमती देता येऊ शकत नाही’, असे पीठाचे न्या. बदर दुर्रेझ अहमद व न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी सांगितले. याप्रकरणी आम्ही विधिमंडळ स्तरावर बदल करण्यास सांगू शकत नाही. या रिक्षा नियमित करण्यासाठी आवश्यक ती नियमावली केंद्र सरकारने करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
प्रामाणिकपणाची तपासणी हातावर जळता कापूर ठेवून
सालेम, तामिळनाडू : एका धक्कादायक घटनेत वसतिगृहातील तेरा मुलांच्या हाताच्या तळव्यावर त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्यासाठी जळता कापूर ठेवण्यात आला. वसतिगृहातील एका विद्यार्थ्यांचे पैसे त्याच्या बॅगमधून हरवले होते. या घटनेनंतर अदि द्रविदार समुदाय कल्याण विभागाने चालवलेल्या या वसतिगृहाच्या वॉर्डन व दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पाचवीतील या मुलांचे हात भाजले आहेत. ते या वसतिगृहात राहात होते तेव्हा सातवीच्या मुलांपैकी एकाच्या बॅगेतील ११० रुपये चोरीस गेले त्या वेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीच्या मुलांच्या हाताच्या तळव्यावर जळता कापूर ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाच्या वेळी वॉर्डन व त्यांचे दोन सहायक उपस्थित नव्हते. पोलिसांनी सांगितले, की ही घटना घडली तेव्हा वसतिगृहाचे अधिकारी उपस्थित नव्हते. वॉर्डन व दोन सहायकांना काल अटक करण्यात आली आहे.
चिलीत मेट्रो स्टेशनजवळ स्फोट १४ जखमी
सँटियागो : चिलीची राजधानी सँटियागोतील मेट्रोच्या सबवे स्टेशनच्या पुढे असलेल्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये स्फोट होऊन १४ जण जखमी झाले. चिलीच्या मते हा अतिरेकी हल्ला असून कुठल्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यापूर्वीच्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अराजकतावादी गटांनी स्वीकारली होती. चिली सरकारने म्हटले आहे की, सरकार दहशतवाद विरोधी कायदे लागू करील. रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या भोजनाची वेळ असताना एस्कूला बसबे स्टेशनला जोडलेल्या भूमिगत शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, स्फोटाच्या ठिकाणचे दृश्य भयानक होते, प्रवासी सैरावैरा पळत होते. धुराचे लोट उठत असताना काही जण ओरडत होते. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झालेली नाही. दरम्यान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल,असे चीलीच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.
पर्यावरण मंत्रालयाचा कारभार ढिसाळ ; हरित लवादाचे ताशेरे
नवी दिल्ली : पश्चिम घाट प्रश्नी पर्यावरण व वन खाते पर्यावरण संवेदनशील अशा पश्चिम घाटाच्या संरक्षणाबाबत भूमिका घेताना सतत आपली मते बदलत असून मंत्रालयाचा कारभारच गलथानपणाचा आहे, असे ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाने ओढले आहेत.
वनं आणि पर्यावरण मंत्रालयाने डॉ.माधव गाडगीळ यांचा अहवाल गुंडाळून ठेवल्यानंतर आता मंत्रालयाने लवादाला असे सांगितले, की कस्तुरीरंगन व गाडगीळ या दोघांच्याही अहवालाबाबत आम्हाला शंका असून प्रत्यक्ष आखणी करणे गरजेचे आहे.
त्यावर ‘पर्यावरण व वन मंत्रालयाचा कारभार गलथानपणाचा आहे हे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. प्रतिज्ञापत्रातील भाषा अतिशय दिशाभूल करणारी असून सरकारने एक आठवडय़ात नवे प्रतिज्ञापत्र दाखल करावे’, असे आदेश हरित लवादाचे न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी दिले.
पाकिस्तानी नौदल गोदीवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला
कराची : पाकिस्तानी नौदलातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तालिबानी दहशतवाद्यांनी नौदलाच्या गोदीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र नौसैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी दोन्ही बाजूंनी उडालेल्या धुमश्चक्रीत नौदलाचा एक अधिकारी आणि दोन दहशतवादी ठार झाले.
नौदलाच्या या गोदीत घुसण्याचा प्रयत्न सहा दहशतवाद्यांनी केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न नौदलाचे सैनिक आणि तटरक्षक दलाचे सुरक्षारक्षक यांनी हाणून पाडल्याने दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक सेवेत असलेला नौदलाचा अधिकारीच होता. या हल्ल्यात सात जण जखमी झाले.
तेहरीक-ई-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. नौदलाच्या काही अधिकाऱ्यांच्या मदतीमुळेच आम्हाला हा हल्ला करणे शक्य झाले, असे या संघटनेने म्हटले आहे.
शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी हाच कळीचा मुद्दा!
पाकिस्तानात राजकीय तोडगा दृष्टिक्षेपात?
इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून उफाळलेल्या राजकीय संघर्षांवरील तोडगा दृष्टिक्षेपात दिसू लागला आहे. माजी क्रिकेटपटू आणि राजकीय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी केलेल्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पायउतार व्हावे, या मुख्य मागणीवर चर्चाच होऊ शकत नाही या भूमिकेवर सरकार ठाम असल्याने तोच कळीचा मुद्दा ठरणार आहे.सरकार आणि खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्ष यांच्यात चर्चेच्या १२ फेऱ्या झाल्या. जवळपास सर्व मागण्यांवर तडजोड झाली आहे. मात्र जे वादग्रस्त विषय आहेत त्याबाबत पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे अर्थमंत्री इशाक दार यांनी सांगितले.
राजधानीतील ‘ई-रिक्षा’ बेकायदेशीरच
राजधानीत सध्या धावत असलेल्या ‘ई-रिक्षा’ बेकायदाच असल्याचे स्पष्ट करून या रिक्षांना नियमित करण्यासंबंधी केंद्र सरकार नियमावली करीत नाही,
First published on: 10-09-2014 at 12:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National and international news in short