सेंटर फॉर रेल्वे इनफॉर्मेशन सिस्टीम्स या संस्थेने रेल्वे चौकशीसाठी अँड्रॉइड अ‍ॅप तयार केले असून त्यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. विंडोज व अँड्रॉइडवर हे अ‍ॅप उपलब्ध असून त्याचे नाव द नॅशनल ट्रेन इनक्वायरी सिस्टीम (एनटीईएस) असे आहे. ते मोफत डाऊनलोड करता येईल. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांना आता रेल्वेच्या वेळा व संबंधित माहिती लगेच मिळेल. सीआरआयएस व आयटी शाखेने यापूर्वी रेल्वेसाठी विंडोज ८ साठी अ‍ॅप सादर केले होते. आताच्या अँड्रॉइड अ‍ॅपमुळे तुम्हाला रेल्वेची सद्य स्थिती व प्रत्येक स्थानकावर तिची येण्याची वेळ व जाण्याची वेळ समजू शकेल. ट्रेन्स बिटविन स्टेशन्स, लाइव्ह स्टेशन, रद्द झालेल्या व वळवलेल्या गाडय़ांची माहिती त्यात मिळेल. येत्या दोन ते चार तासात येणाऱ्या व जाणाऱ्या गाडय़ांची माहिती कळेल.

मलेशियन विमानाची शोधमोहीम
सीडनी : मलेशियाचे बेपत्ता विमान सापडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, मात्र मलेशियन सरकारने अद्याप आशा सोडलेली नाही. बेपत्ता विमानाचे अवशेष सापडतील, असा त्यांना आशावाद असल्याने त्यांनी शोधमोहीम थांबवलेली नाही. या विमानाच्या शोधासाठी आता मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दुसरे लढाऊ जहाज पाठविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला १८०० किलोमीटर अंतरावर या विमानाची शोधमोहीम सुरू आहे. ‘द गो फोएनिक्स’ हे मलेशियन जहाज बुधवारी या शोधमोहिमेत सामील झाले. ८ मार्च रोजी बेपत्ता झालेले हे विमान नक्कीच सापडेल, असे मलेशियाचे संरक्षणमंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान वर्गास मंत्र्यांची दांडी
पाटणा- बिहारमध्ये मंत्र्यांना संगणक व टॅबलेट संगणक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे पण त्यांच्यापैकी निम्म्याहून कमी मंत्री प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहिले. एकूण ३२ मंत्र्यांपेकी दहा मंत्र्यांनी यावेळी हजेरी लावली. मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी या वर्गाचे उद्घाटन केले. मंत्र्यांनी तंत्रज्ञान आत्मसात केले तर त्यांना कुणी फसवू शकणार नाही, आपण स्वत: माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण घेणार आहोत. माहिती तंत्रज्ञानात मागे राहिल्यास आपले राज्य विकासात मागे पडेल असे त्यांनी सांगितले. अधिकारी, मंत्री, राजकीय नेते यांना संगणक, लॅपटॉप व इंटरनेटचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माहिती तंत्रज्ञान मंत्री शाहीद अली खान यांनी आजच्या काळात संगणक व इंटरनेट साक्षरता हीच खरी साक्षरता असल्याचे सांगितले.

फटाक्यांच्या स्फोटात दोन ठार
हैदराबाद  : तेलंगणातील नळगोंडा जिल्ह्य़ात घरात ठेवलेले फटाके पेटल्याने दोनजण जळून मरण पावले असे पोलिसांनी सांगितले.  बी. श्रीनिवास हे फटाके विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यामुळे त्यांनी फटाके भोनगीर येथील घरात आणून ठेवले होते. खोलीत इमर्जन्सी दिवा चार्जिगला ठेवला असताना फटाके पेटले, त्यामुळे आग लागली त्यात कल्याण (वय २०) व नागेश्वर (वय ६०) जळून मरण पावले. पोशेट्टी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे भोनगीर पोलीस स्टेशनचे निरीक्षक जे. नरेंद्र यांनी सांगितले. श्रीनिवास व त्यांच्या कुटुंबीयांनी आगीतून सुटका करून घेतली. घराचा पुढचा भाग या आगीत जळून खाक झाला. घरमालक श्रीनिवास याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

अनिता सिंग यांची नेमणूक
वॉशिंग्टन- भारतीय-अमेरिकी महिला अनिता एम सिंग व्हाईट हाऊसमध्ये सायबर प्रश्नांविषयी काम करीत होत्या. त्यांची नियुक्ती आता अमेरिकी न्याय व राष्ट्रीय सुरक्षा विभागात चिफ ऑफ स्टाफ व कौन्सेलर म्हणून करण्यात आली आहे. दीड वर्ष त्या या पदावर हंगामी प्रमुख म्हणून काम करीत होत्या. देशांतर्गत धोक्यांबाबत धोरणात बदल करण्याचे काम त्या करतील. त्यांनी यापूर्वी संगणक गुन्हे विभाग व बौद्धिक संपदा विभागात काम केले आहे. पेनसिल्वानिया कायदा महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आहे.

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यास अटक
नवी दिल्ली : पर्यटनासाठी गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडण्यासंदर्भात मुंबईतील एका व्यावसायिकाकडून पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रेल्वे बोर्डाचे अधिकारी रविमोहन शर्मा यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी त्यांच्या घरीच अटक केली. शर्मा हे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या १९९७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. शर्मा यांना ही लाच हवालाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्याच्या हंगामात विशेष गाडय़ा आणि जादा डबे जोडले जावेत, या हेतूने ही लाचबाजी करण्यात आली होती.

मध्य प्रदेशात भूकंप
जबलपूर- मध्य प्रदेशात जबलपूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला. आजूबाजूच्या भागात हा धक्का जाणवला त्यामुळे लोक घाबरून गेले. जिल्हाधिकारी शिवनारायण रूपला यांनी सांगितले की, सकाळी सव्वाअकरा वाजता हा धक्का बसला. काही सेकंद हा धक्का जाणवला असून या भूकंपात कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाची तीव्रता समजलेली नाही.

माओवाद्यांना अटक
रायपूर- छत्तीसगड येथील बस्तर या नक्षलग्रस्त भागात तीन माओवाद्यांना अटक करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. जिलाराम जग्गू ( वय २४) व मनारू (वय २८) ही या नक्षलवाद्यांची नावे असून त्यांना विशेष कामगिरी दलाने अटक केली.

Story img Loader