भारताच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलताना केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश राज्याच्या ११२६ किलोमीटर लांबीच्या सीमावर्ती भागात ५४ नव्या चौक्या उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स’साठी या चौक्या उभारण्यात येणार आहेत. यासाठी गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.या नव्या चौक्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तसेच तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. तसेच यामध्ये नियमित पहाऱ्यावरील सैनिकाबरोबरच आपत्कालीन परिस्थिती अधिक जवान मुक्काम करू शकतील.
जयललितांचे आता ‘अम्मा मीठ’
चेन्नई : स्वस्त दरात जेवण आणि पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आणलेले ‘अम्मा मीठ’ जनतेला चाखायला मिळणार आहे. लवकरच त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तामिळनाडू मीठ महामंडळाच्या वतीने हे मीठ बाजारात आणले जाणार असल्याची एक जाहिरात महामंडळाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. हे मीठ तीन प्रकारांत तयार केलेले असेल. यात प्रमाणित मीठ, आयोडिनयुक्त मीठ आणि सोडियमचे प्रमाण कमी असलेले मीठ, अशी वर्गवारी करण्यात आली आहे. परंतु या मिठाची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. जयललिता यांचे समर्थक त्यांना ‘अम्मा’ नावाने बोलावतात. त्यांच्याच नावाने हे मीठ तयार केले जाणार आहे. कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून मिठाची निर्मिती करण्यात आल्याचे महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
जयललितांच्या पुतळ्याचे श्रीलंकेत दहन  
कोलंबो : श्रीलंकेविरोधात कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने आग्रही भूमिका मांडणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कोलंबो शहरात मंगळवारी दहन करण्यात आले. या वेळी शेकडो निदर्शकांनी भारतीय दूतावासासमोर धरणे धरले. जयललिता १३व्या दुरुस्तीसाठी पंतप्रधानांवर अकारण दबाव टाकीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. श्रीलंकेतील ‘नॅशनॅलिस्ट ऑर्गनायझेशन’च्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपाक्षे आणि जयललिता यांच्या प्रतिमा उंचावून निदर्शने केली.
भारतीय पंतप्रधानांवर अकारण दबाव टाकणाऱ्या आम्ही जयललिता यांच्याविरोधात येथे निदर्शने करीत आहोत, अशी माहिती डॉ. वसंता बंदरा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेची सकारात्मक चर्चा
तेहरान : जीनिव्हा येथे इराण व अमेरिका यांच्यात इराणच्या अणुकार्यक्रमावर झालेली बोलणी सकारात्मक स्वरूपाची होती, असे इराणचे मुख्य मध्यस्थ अब्बास अरकाची यांनी सांगितल्याचे समजते. अमेरिकेशी सकारात्मक वातावरणात चर्चा झाली व ती सकारात्मक होती असे आयएसएनए या वृत्तसंस्थेने अरकाची यांचा हवाला देऊन म्हटले आहे. अमेरिकी प्रतिनिधी मंडळाशी जीनिव्हा येथे प्रदीर्घ काळ चर्चा झाली, ही चर्चा पुढे सुरू राहणार आहे. अमेरिका व इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवस चालणाऱ्या चर्चेच्या सुरुवातीला इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमावर २० जुलैपूर्वी तोडगा काढण्याचे निश्चित केले. इराणला र्निबधामुळे फटका बसला असून त्यातून सुटण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
इस्त्रायलला लवकरच नवे अध्यक्ष
जेरूसलेम : नोबेल विजेते शिमोन पेरेस यांना हटवून नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यात मंगळवारी इस्त्रायल संसद सदस्यांना अपयश आले. त्यामुळे आघाडीवर असलेल्या रुवेन रीव्हलीन आणि मीर शीतरीत यांच्यातून एकाची निवड करण्यासाठी नव्याने मतदान घेण्यात आले.
राष्ट्राध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डालिया डॉर्नर, माजी दळणवळण मंत्री डालिया इटझिक आणि रसायन शास्त्रातील नोबेल विजेते संशोधक डॅन शेश्टमॅन हे पराभूत झाले. दुसऱ्या फेरीतील मतदानाचा निकाल संसद अध्यक्ष युली एडलस्टेन मंगळवारी सायंकाळी उशिरा जाहीर होतील. नवे राष्ट्राध्यक्ष येत्या २४ जुलैला शपथ घेतील. विजयी उमेदवारांना संसदेतील १२० सदस्यांपैकी ६१ जणांची मते मिळवावी लागतील.
भागीरथी नदीत बस कोसळून दोन रशियन ठार
उत्तराखंड : गंगोत्रीकडे पर्यटनासाठी गेले असताना बस भागीरथी नदीत कोसळून उत्तरकाशी जिल्ह्य़ात दोन रशियन नागरिक मृत्युमुखी पडले तर दोन बेपत्ता आहेत. हरशिलपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या धराली या ठिकाणी ही दुर्घटना घडली असून तेरा रशियन प्रवासी या बसमध्ये होते व ते उत्तरकाशी येथून गंगोत्रीकडे निघाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात हृषीकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजता झाला. भागीरथी ही गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील नदी आहे.

Story img Loader