हिंदू यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या बसला झालेल्या अपघातात १६ जण ठार झाले असून, त्यात काही भारतीयांचा समावेश आहे. पश्चिम नेपाळमध्ये ती बस नदीत कोसळली.
यात ११ भारतीय मरण पावले असून, ही बस डोंगराळ रस्त्यावरून घसरत गेली. प्युथन जिल्हय़ातून ही बस परतत असताना काठमांडूपासून २५० कि.मी. अंतरावर अपघात झाला असे मुख्य जिल्हा अधिकारी राम बहादूर मरूमबांग यांनी सांगितले. भारतीय दूतावासाने सांगितले, की याबाबत प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले असून मृतांमध्ये बहुतांश भारतीय यात्रेकरू आहेत.
हे भारतीय प्रवासी उत्तर प्रदेशातील बलरामपूर व गोंडा जिल्हय़ातील होते. बस स्वारगडवारी येथून कपीलवास्तूला परत येत होती. बसमध्ये साठ प्रवासी होते. मदतकार्य पथकांनी १० अज्ञात मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यात सात महिला आहेत. अपघातात २० जण वाचले असून, त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
अपहृत कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पावले उचलण्याची मागणी
शिवगंगा (तामिळनाडू) : अॅलेक्स प्रेमकुमार याचे अफगाणिस्तानातील हेरात येथून अपहरण झाल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी त्वरित पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. प्रेमकुमार याचे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सोमवारी अपहरण केले आहे.अलेक्सचे वडील फादर अॅन्थोनी, बंधू अल्बर्ट मनोहर व बहीण एलिझाबेथ यांनी जिल्हाधिकारी व्ही. राजारामन यांची भेट घेऊन प्रेमकुमारच्या सुटकेसाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यासंबंधी निवेदन दिले. ‘सोसायटी जेस्युएटी ऑफ तामिळनाडू’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अशाच प्रकारचे निवेदन दिले आहे. अॅलेक्स प्रेमकुमार हा ४७ वर्षांचा असून त्याचे कुटुंब देवकोट्टाईचे रहिवासी आहेत. अॅलेक्स हा २०११ मध्येच हेरात येथे गेला होता.
पाकिस्तानी हवाई दलाचे विमान कोसळले; ४ ठार
कराची : प्रशिक्षण मोहीम सुरू असताना पाकिस्तानी हवाई दलाचे ‘मिरॅग’ हे विमान कोसळले. या विमानातील दोन्ही वैमानिकांचा आणि दोन सामान्य नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. कराचीमधील बस टर्मिनलवर मंगळवारी सकाळी हे विमान कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. या टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या तीन बसचे यामुळे मोठे नुकसान झाले. बस टर्मिनलजवळील इमारतीचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यांना कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न उधळला
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्य़ात भारत-पाकदरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या दक्ष जवानांनी मंगळवारी उधळून लावला.
कथुआ जिल्ह्य़ातील हिरानगर तालुक्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे मध्यरात्री लक्षात आले होते. सीमा सुरक्षा दलाच्या दक्ष जवानांनी वेळीच हालचाल करून घुसखोरांवर गोळीबार केला. परिणामी हे घुसखोर पुन्हा पाकिस्तानात परतले, अशी माहिती दलाच्या सूत्रांनी दिली. घुसखोरीचा प्रयत्न झालेल्या परिसरात आज सकाळी पाहाणी केली असता रक्ताचे डाग आढळून आल्याचेही या सूत्रांनी सांगितले. या परिसरात सीमा सुरक्षा दलाने आपली गस्त अधिक कडक केल्याचे सांगण्यात आले.
पृथ्वीपेक्षा महाकाय ग्रहाचा शोध
वॉशिंग्टन : पृथ्वीसारख्या आकाराच्या ग्रहांमधील सर्वात मोठय़ा आकाराचा पृथ्वीसारखा खडकाळ ग्रह सापडला असून, त्याचे वजन आपल्या पृथ्वीच्या वजनापेक्षा १७ पट जास्त आहे, त्यामुळे विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे वैज्ञानिकांचे अनुमान बदलणार आहे. या महापृथ्वीचे नामकरण केप्लर १० सी असे करण्यात आले असून तो सूर्यासारख्या ताऱ्याभोवती ४५ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो पृथ्वीपासून ५६० प्रकाशवर्षे दूर असलेल्या कालीय तारकासमूहात आहे. सैद्धान्तिक वैज्ञानिकांच्या मते अशा जड ग्रहांशिवाय विश्व अस्तित्वात असू शकत नाही, कारण हे ग्रह मोठय़ा प्रमाणात हायड्रोजन ओढतात व गुरूसारखे वायू ग्रह तयार होतात. हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स संस्थेचे खगोलवैज्ञानिक झेवियर डय़ुम्युस्क्यू यांनी ही माहिती दिली.
मान्सूनचे दोन दिवसांत केरळमध्ये आगमन
नवी दिल्ली : मान्सून आता ठरल्याप्रमाणे येत्या ४८ तासांत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज येथील वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. पाच जूनपर्यंत हे आगमन अपेक्षित आहे.केरळमध्ये मान्सून येण्यास आता वातावरण योग्य झाले असून अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. मालदीव, कोमोरियन भाग तसेच तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी यामुळे येत्या ४८ तासात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे.ईशान्येकडील राज्यांतही येत्या ७२ तासांत मान्सून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, ओदिशा, आसाम, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक तसेच दक्षिण केरळमध्ये मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानचा नेता अल्ताफ हुसेन याला अटक झाल्यानंतर कराचीत हिंसाचार
लंडन/कराची : पाकिस्तानमधील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) या बलशाली संघटनेचा नेता अल्ताफ हुसेन याला बेकायदेशीररीत्या पैसे हस्तांतरण (‘मनी लॉण्डरींग’) च्या आरोपाखाली मंगळवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. या घटनेचे कराचीतील त्याच्या प्रभावशाली क्षेत्रात पडसाद उमटून त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. कराची येथे गोळीबार करण्यात आला तसेच वाहनांना आगी लावण्यात आल्या. कायदेशीर मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी प्रारंभी त्याचे नाव उघड केले नव्हते. नंतर ‘एमक्यूएम’ च्या लंडन शाखेतील पदाधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कराचीत हुसेनचे चांगलेच प्राबल्य असून त्याला अटक करण्यात आल्यानंतर कराची शहरातील ब्रिटनचा दूतावास तात्पुरता बंद ठेवण्यात आला.
मलेशियन विमान पाहिल्याचा ब्रिटिश महिलेचा दावा
लंडन : बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या विमानाचे गूढ वाढतच चालले असतानाच एका ब्रिटिश महिलेने मात्र आपण हे विमान पाहिले असल्याचा दावा केला आहे. इंडोनेशियाच्या समुद्रात जलवाहतूक करीत असताना आपण जळणारे एक विमान पाहिले होते, ते जिथे बुडाले तिथे महातरंग उठले होते आणि त्यातून प्रचंड धूर येत होता, असा दावा या ब्रिटिश महिलेने केला आहे.हिंदी महासागराच्या दक्षिणेस हे विमान बुडाल्याची या महिलेने दिलेली माहिती खरी ठरली तर ती या घटनेची एकमेव प्रत्यक्षदर्शी असेल. तिच्या माहितीद्वारे या विमानाचा शोध घेण्यास मोठी मदत मिळू शकेल. कॅथरिन टी असे नाव असलेल्या या महिलेला नौकानयनाची आवड आहे. . ‘‘एक लांबलचक विमान बुडत होते, ज्याच्याभोवती आगीच्या ज्वाळा आणि काळय़ाकुट्ट धुराचा वेढा होता,’’ असे वर्णन कॅथरिनने केले.
हसन अली खानविरोधात तातडीने खटला ?
पीटीआय, नवी दिल्ली : पुणे येथील ‘स्टड फार्म’ चा सर्वेसर्वा हसन अली खान याच्याविरोधातील खटला मुंबईच्या न्यायालयात जलदगतीने सुरू करण्यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खान याच्याविरोधात बेकायदेशीररीत्या पैसे हस्तांतरण (‘मनी लॉण्डरींग’) प्रकरणी काळ्या पैशांचे खटले २०११ पासून प्रलंबित असून हेच खटले जलदगतीने सुरू करण्याचा यंत्रणांचा इरादा आहे.खान याने करचुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय, मुंबईस्थित आर्थिक गुन्हेविभाग आदींनी ६० वर्षीय हसन अलीविरोधात याआधीच तक्रारी दाखल केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या एकूण हालचालींमुळे हसन अलीविरोधातील खटल्यांना वेग येण्याची शक्यता आहे.